बीड : फितुरीच्या राजकारणासाठी भगवानगडाचं पावित्र्य भंग करणाऱ्या धनंजय मुंडे यांना संतश्रेष्ठ भगवानबाबा कळलेच नाहीत, अशा भावना सावरगावचे सरपंच रामचंद्र सानप, युवा कार्यकर्ते संदेश सानप, उपसरपंच इंदर सानप, नारायण सानप, राजेंद्र खाडे आदींसह असंख्य ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मस्थळी साकारत असलेल्या भव्य दिव्य स्मारकामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची पोटदुखी वाढली असून त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे व भगवानगडाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सावरगाव घाटच्या ग्रामस्थांसह भगवानबाबांचे अनुयायी संतापले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व समाज बांधवांच्या भावनांचा आदर करून सावरगाव घाट येथे भगवानबाबा स्मारक उभारणीचे कार्य हाती घेतले आहे. यासाठी ऊसतोड कामगारांसह द-याडोंगरातील अठरापगड जाती व संतश्रेष्ठ भगवानबाबांचे अनुयायी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत.
पाटोदा येथे कार्यक्र मात धनंजय मुंडे यांनी प्रति भगवानगड उभारणे योग्य आहे का, असा सवाल करून सावरगाव घाट वासियांच्या भावना दुखावल्या, असे निवेदनात म्हटले आहे. सरपंच सानप म्हणाले की, सावरगाव वासियांनी भगवानगडावर जमणाºया समाजशक्तीला उधळवण्याचे कारस्थान हाणून पाडत दसरा मेळावा जन्मगावी घेण्याचे आमंत्रण पंकजा मुंडे यांना दिले होते.दसरा सावरगावला : ग्रामस्थांची भावनापंकजा मुंडे यांनी वडिलांचे गोपीनाथगड येथे स्मारक बांधून सावरगावात भगवानबाबांचे स्मारक बांधत भक्तीस्थान व पितृस्थान दोघांचाही सन्मान केला आहे. भगवानगडाचा विकास करु द्या, दोन पाऊलं मी मागं घेते, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले होते. तरीही महंतांचा दुराग्रह कोंडी वाढवणारा ठरल्याने सावरगाव येथे दरवर्षी दसरा मेळावा व्हावा, अशी ग्रामस्थांची भावना होती, असेही निवेदनात म्हटले आहे.