अंबाजोगाई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाने अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील साखर कारखाना जमीन गैरव्यवहार प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला आहे. प्रकरणाच्या सुनावणीसाठी धनंजय मुंडे सोमवारी अंबाजोगाईतील कोर्टात आले होते.
अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील प्रस्तावित साखर कारखाना प्रकरणात 2018 साली धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2018 मध्ये मुंजा गित्ते यांच्या तक्रारीनुसार मुंडे यांच्याविरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी वॉरंट निघाल्यानंतर धनंजय मुंडे हे स्वत: कोर्टापुढे हजर झाले आणि जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. हा साखर कारखाना सुरू करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी 2006 ते 2010 या कालावधीत शेकडो एकर जमीन विकत घेतली. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून तब्बल 25 कोटी रुपयांचे भागभांडवलही उभे केले, मात्र कारखाना काही सुरु झाला नाही. या प्रक्रियेत धनंजय मुंडे यांनी पूस या गावात असलेल्या बेलखंडी मठाची 25 एकर जमीनही विकत घेतली.
ही जमीन बेलखंडी मठाला इनाम दिलेली जमीन होती आणि त्याचा विक्री व्यवहार होऊ शकत नव्हता. याची माहिती असतानाही बेकायदेशीर पद्धतीने ही जमीन विकत घेण्यात आली आणि धनंजय मुंडे अडचणीत सापडले. पुढे जगमित्र साखर कारखान्याची मान्यता नाकारण्यात आली आणि हा कारखाना सुरु होण्याआधीच बंद पडला. पण त्यानंतरही कारखान्याने जमीन परत केली नाही.