बीड - राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनाबीड जिल्हा धनुभाऊ या नावाने आपला नेता मानतो. पण, आज याच धनुभाऊमधील बापमाणूस गहिवरल्याचं सर्वांनी पाहिल. एका रेल्वे पटरीजवळ फेकून दिलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाचे पालकत्व धनंजय मुंडेंनी स्विकारले. त्यासाठी, खासदार सुप्रिया सुळेंची मदत त्यांना मिळाली. धनंजय मुंडेंच्या या कृतीमुळे त्यांच्याबद्दलचा आदर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणखी वाढला आहे.
अनैतिक संबंधातून किंवा नकोशी असल्याने नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला रेल्वे पटरीजवळ काटेरी झुडुपात टाकून दिल्याचा धक्कादायक व संतापजन प्रकार समोर आला होता. याबाबत माहिती मिळताच, परळीचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या मुलीचे पालकत्व स्वीकारले आहे. विशेष म्हणजे या मुलीचे नामकरणही केले. या प्रकाराबद्दल संताप आणि मुलीची काळजी व्यक्त करत त्यांनी चिमुकलीची संपूर्ण जबाबदारी घेतली. महाशिवरात्री महोत्सव काळातच हा प्रकार घडल्याने या मुलीचे ‘शिवकन्या’ असे नामकरण करण्यात आले आहे.
परळी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून सदरील स्त्री जातीच्या नवजात अर्भकाबद्दल धनंजय मुंडेंना माहिती मिळाली होती. त्यानंतर, सुप्रिया सुळेंच्या मदतीने त्यांनी या मुलीचे पालकत्व स्विकारले. ''हा प्रकार ऐकताच आपले मन खिन्न झाले असून सदर मुलीची मी व खा. सुप्रियाताई पूर्ण जबाबदारी घेत आहोत. तिची तब्येत सुरळीत होताच तिला पुण्यातील सर्व सोयीयुक्त बालकाश्रमात हलवण्यात येईल, तसेच पुढील संगोपन, शिक्षण ते अगदी लग्नासहित या बालिकेची सम्पूर्ण जबाबदारी आमची असेल,'' असे धनंजय मुंडेंनी सांगितले आहे.
काटेरी झुडपात टाकण्यात आलेल्या नकोशीचा रात्री 8 च्या सुमारास रडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांनी ऐकला. त्यानंतर हा प्रकार पोलिसांच्या कानावार घालण्यात आला. या प्रकरणाचा पोलिस तपास घेत आहेत. दरम्यान, सद्यस्थिती त्या चिमुकलीवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जि. प. गटनेते अजय मुंडे व डॉ. संतोष मुंडे तसेच गटनेते वाल्मिक अण्णा कराड हे रुग्णालयात हजर असून पुढील परिस्थिती हाताळत आहेत.