परळी ( बीड ) : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. त्यामध्ये ६ ग्रामपंचायत पैकी पाच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. तर भोपळा या एका ग्रामपंचायत मध्ये भाजपनेते प्रा टी पी मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, खा प्रीतम मुंडे यांच्या मार्गर्शनाखाली पुरस्कृत पॅनलचा विजय प्राप्त झाला आहे. या निवडणूक निकालामुळे धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाचा राष्ट्रवादीच्या मतांवर परिणाम न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
परळी तालुक्यातील लाडझरी, मोहा ,सर्फराजपूर , भोपळा, गडदेवाडी , रेवली येथील ग्रामपंचायतीच्या 42 जागेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले याचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला . लाडझरी सर्फराजपुर ,गडदे वाडी, येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल ला यश मिळाले तर मोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस -भाजप पुरस्कृत पॅनल विजय मिळाला आहे.. रेवली येथे एका जागेसाठी मतदान झाले होते त्यात अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर या कालावधीतच अत्याचाराचे गंभीर आरोप करण्यात आले. यावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांना घेरण्याचा पर्यंत केला. मात्र, मतदानावर याचा परिणाम झाला नसल्याचे आज आलेल्या निकालावरून दिसून आले आहे.
तसेच वंजारवाडी ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झाली आहे ,रेवली, वंजारवाडी ही राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात असल्याचे पक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे.. भाजपा नेते प्रा टी पी मुंडे यांच्या मार्गर्शनाखाली अनेक वर्षा पासून असलेली भोपळा ग्रामपंचायत या वेळी त्यांच्याकडेच राहिले आहे .निकालानंतर जगमित्र या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू आहे.