बीड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी शेतकऱ्यांचे विमा वाटप थकवलेल्या बजाज कंपनीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश धनंजय मुंडे यांनी दिले.
यावेळी पीकविमा संदर्भात मुंडे यांनी ओरिएंटल व बजाज या दोन्ही प्रमुख कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत बैठक घेतली. ओरिएंटल इन्शुरन्स कम्पनीने मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे २०१८ चा थकीत पीकविमा वाटपास सुरुवात केली आहे. तर ९० हजार नाकारलेल्या शेतकऱ्यांच्या पिकविम्याबाबत २७ तारखेपर्यंत लेखी याद्या देण्याचे निर्देशही मुंडे यांनी दिले.
तर जवळपास ७ लाख शेतकऱ्यांचे विमा वाटप थकवलेल्या बजाज कंपनीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही मुंडे यांनी यावेळी दिले. गेल्या अनेक दिवासांपासून पीक विम्याच्या थकबाकीचा प्रश्न प्रलंबित होता. याच पार्श्वभूमीवर प्रमुख पीक विमा कंपनी ओरिएंटल आणि बजाज यांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले होते.
तर याचवेळी मुंडेंनी विद्युत वितरण कंपनीला शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्या अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे. तसेच नियोजन आराखड्यामध्ये यासाठी विशेष ५ कोटी रुपयांची तरतूदही केली असल्याचे सुद्धा जाहीर केले.