परळी ( बीड) : तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री असलेले धनंजय मुंडे (Dhananjay Munde) मंत्रीपद आणि पक्षीय जबाबदारीमुळे कायम व्यस्त असत. यामुळे त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यात वेळेअभावी दुरावा झाला होता. मात्र आता सत्तेत नसल्याने मुंडे पुन्हा एकदा परळीमध्ये सक्रीय झाले आहेत. यामुळेच मुंडे आता शहरात कार्यकर्त्यांच्या गराड्यात दिसतात. दरम्यान, मुंडे यांचा हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत चहा घेतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. नेतेपणा बाजूला सारत कार्यकर्त्यांसोबत चहा घेणाऱ्या मुंडे यांच्या साधेपणाची चर्चा सुरु आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, कारखाना, बँक निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा विधानसभा क्षेत्रात संपर्क वाढवला आहे. राष्ट्रवादी आपल्या दारी या अभियानांतर्गत परळी शहरातील काही प्रभागात मुंडे यांनी डोअर टू डोअर भेटी दिल्या. त्यानंतर आता नवरात्रीत विविध दुर्गोत्सव मंडळास त्यांनी भेटी सुरु केल्या आहेत. दरम्यान, नेहरू चौकातील श्री वैद्यनाथ तरुण दुर्गोत्सवास 44 वर्ष पूर्ण झाली. येथे शुक्रवारी रात्री आठ वाजता आरतीसाठी मुंडे पोहचले.
आरती आणि भेटीगाठी आटोपल्यानंतर माजी नगरसेवक राजा खान पठाण, जयराज देशमुख, मजाज इनामदार या कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून मुंडे जवळच्याच मेघराज हॉटेलवरच चहा पिण्यास आले. चहा पिताना गप्पा चांगल्याच रंगल्या. यावेळी मुंडे यांनी चहा पीत मनमोकळ्या गप्पा, चर्चा केल्याने कार्यकर्ते मात्र जाम खुश झाले. तसे पाहिले तर धनंजय मुंडे राज्यातील आघाडीचे नेते असून मोठ्याप्रमाणावर व्यस्त असतात. मात्र, परळीत ते सर्वसामान्य होऊन सर्वांना भेटतात अशी चर्चा सुरु आहे.