बीड : संवैधानिक पदावर असलेले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी न्यायालयाचा आदेशाचा मान ठेवून जगतमित्र सूतगिरणी प्रकरणी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा. शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या शरद पवार यांनीही दखल घेऊन मुंडे यांच्या हातात नारळ द्यावा. धनंजय मुंडे यांचा ‘खोट बोल, पण रेटून बोल’, हा खरा चेहरा जनतेसमोर आलेला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आ.सुरेश धस यांनी केली आहे.
अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने संत जगतमित्र सुतगिरणी प्रकरणी संचालकांपैकी असलेले धनंजय मुंडे यांची मालकीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले असूनही धनंजय मुंडे खोटे बोलून या प्रकरणाला राजकीय वळण देऊन आपल्या बचावाचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार औरंगाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी विशेष तपास यंत्रणा (एस.आय.टी.) स्थापन करण्यात आलेली असून ही यंत्रणा अतिरिक्त पोलीस महासंचालक नियंञण असलेली आहे. त्यामुळे बीड पोलीस अधीक्षकांचा काहीही संबंध नसताना विनाकारण त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप धनंजय मुंडे हे करीत आहेत.
या सूतगिरणी आणि संचालकांच्या व्यक्तिगत मालमत्तेवर टाच असल्याचे सांगून सध्याचे आठ संचालक सध्या जात्यात असून बाकीचे सुपात आहेत. त्यांच्यावरही यथावकाश कारवाई होणार आहे. तरी उठसूट राज्य शासनावर आणि इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे धनंजय मुंडे तोंडघशी पडले असून जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. लोकांना नैतिकता शिकविणारे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेनुसारच विधान परिषद, विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी केली आहे.