परळी (बीड):बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर असलेले दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाला साकडे घातले. यानंतर रिमझिम पावसात मंदिराबाहेरील हॉटेलवर चहा घेत मुंडेंच्या मित्रांसोबत गप्पात रंगले.
धनंजय मुंडे हे आपल्या वक्तृत्व शैलीबरोबरच साधेपणासाठी देखील नेहमी चर्चेत असतात. परळी शहरात दिवसभर संततधारपाऊस सुरू होता, त्यादरम्यान धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ मंदिरात जाऊन प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही भागामध्ये आणखी समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावू शकते, तर आगामी काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर असलेले दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी प्रभू वैद्यनाथांकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी साकडे घातले.
दरम्यान मंदिरात दर्शन झाल्यानंतर मंदिरासमोरील शिरीष स्वामी यांच्या चहाच्या हॉटेलवर धनंजय मुंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चहा घेतला. . यावेळी गडचिरोली, हिंगोली आदी जिल्ह्यातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी धनंजय मुंडे यांनी संवाद साधत त्यांचीही विचारपूस केली. यावेळी अजय मुंडे, सूर्यभान मुंडे, सुंदर गित्ते, डॉ. संतोष मुंडे आदींची उपस्थिती होती.