Pankaja Munde Dhananjay Munde ( Marathi News ) : बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने यंदा विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत पंकजा मुंडे यांना उमदेवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष महायुतीत सामील असल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचीही साथ पंकजा मुंडे यांना लाभणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज परळी येथे पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे पंकजा यांच्या स्वागताला धनंजय मुंडे हेदेखील गोपीनाथ गडावर उपस्थित होते.
जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत पंकजा मुंडे यांचं परळीत स्वागत करण्यात आलं. यावेळी पंकजा यांच्यासह धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडेही उपस्थित होत्या. तिघे भाऊ-बहीण अनेक वर्षांनंतर एकत्र आल्याने परळीकरही भारावून गेले. पंकजा यांचं स्वागत करत धनंजय मुंडे यांनी भावुक प्रतिक्रिया दिली. "माझ्यासाठी हा अत्यंत भावनिक दिवस आहे. ताईंना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत जिल्ह्याच्या बॉर्डवरच मी करायला सांगितलं होतं. मात्र ताईंनी सांगितलं की, तू पालकमंत्री आहेस, तू घरी थांब. मी तिथं भेटायला येणार आहे. परंतु मी तिचा मोठा भाऊ आहे आणि त्यामुळे मनाचा मोठेपणाही दाखवला पाहिजे, म्हणून सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून मी स्वागत करण्यासाठी आलो आहे," अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी आपल्या भावना मांडल्या.
बजरंग सोनवणेंना इशारा
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार असलेल्या बजरंग सोनवणे यांनी नुकताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर आज धनंजय मुंडेंनी सोनवणे यांचा समाचार घेतला आहे. "महायुतीतील जे कोणी सोडून गेलं, ते का गेलं, याची कारणं शोधून काढली पाहिजेत. त्यांची अतिमहत्त्वाकांक्षा याला कारणीभूत आहे. मागच्या निवडणुकीत आघाडी म्हणून आम्हीच त्यांचं काम केलं होतं. मात्र त्यांची ऐपत काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यांना आपल्या बहिणीला नगरपंचायत निवडणुकीत निवडून आणता आलं नाही, साधी ग्रामपंचायत निवडणूकही जिंकता आली नाही. जे जाणार होते, त्यांनी अगोदरच तयारी केली होती. आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत. ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. आमचा प्रारब्ध होता, तो आज संपला आहे. आम्ही सगळं कुटुंब आता एकत्र आहोत. आता कुणाचा प्रारब्ध सुरू करायचा ते आम्ही तिघं बहीण-भाऊ ठरवू," असा इशारा मुंडे यांनी दिला.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
परळीत झालेल्या जंगी स्वागतानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, "मला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पहिल्यांदाच आशीर्वाद घेण्यासाठी गोपीनाथ गडावर आली आहे. बीड जिल्ह्यात प्रवेश केल्यापासूनच लोकांनी ठिकठिकाणी मला अडवून सत्कार केला. त्यामुळे परळीत येताना मी मार्ग बदलून वेगळ्या मार्गाने आले. माझे बंधू आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनाही मी सांगितलं होतं की, काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी मी घरी येणार आहे. मात्र तरीही ते भाऊ म्हणून येथे स्वागताला आले," असं पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे.