परळी (बीड): हार तुरे आणि सत्कार सोहळे नको, मला काम करू द्या, असे म्हणत राज्याचे कृषीमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे गावागावातील सत्कार टाळत फक्त निवेदने स्वीकारली. ग्रामस्थानसोबत संवाद साधत मंत्री मुंडे नंतर बीडकडे रवाना झाले.
धनंजय मुंडे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्यावर कृषीमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली, मात्र बीड जिल्हा वासीयांना खरी प्रतीक्षा होती ती मुंडे यांच्या पालकमंत्री पदी नियुक्तीची. दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची बीडच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली. आज प्रथमच ते अहमदनगर येथील 'शब्दगंध' या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करून बीडकडे निघाले असता, आष्टी तालुक्याच्या हद्दी पासून गावोगावी लोक रस्त्यावर उतरून धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी उभे होते. मात्र, धनंजय मुंडे यांनी गाडीतून खाली उतरून फुलांनी भरलेल्या जेसीबी बाजूला काढायला लावून, 'तुमचे हार तुरे नको, आता मला काम करू द्या, कामाची निवेदने द्या' असे म्हणत गावकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांचा समस्या जाणून घेतल्या.
बीड जिल्ह्याच्या हद्दीवर दौला वडगाव, चिंचपूर, धामणगाव, अमळनेर, म्हसोबची वाडी, हातोला, जवळागिरी, गणेशगड, लिंबा देवी फाटा अशा अनेक ठिकाणी त्यांनी सत्कार नाकारून केवळ निवेदने स्वीकारली, यावेळी सोबत आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत, आष्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, विठ्ठल अप्पा सानप यांसह अनेक पदाधिकारी सोबत होते.