- संजय खाकरेपरळी( बीड) : तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील समर्थकांच्या पॅनलने बहुतांशी ग्रामपंचायतीत सरशी मिळून वर्चस्व सिद्ध केले आहे. दुपारी साडेबारापर्यंत हाती आलेल्या निकालात 28 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत समर्थकांचे पॅनल विजयी झाले आहे. तर 12 ठिकाणी भाजप पुरस्कृत समर्थकांच्या पॅनलला यश मिळाले आहे.
नाथरा येथे आ. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय मुंडे हे 648 मताने विजयी झाले आहेत. नाथरा ग्रामपंचायत यापूर्वी आ धनंजय मुंडे यांच्या ताब्यात होती. यावेळी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी एकत्रित येऊन नाथरा सरपंच पदाची निवडणूक लढविली होती.
तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. अंबाजोगाईचे अप्पर जिल्हाधिकारी व निवडणूक निरीक्षक सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांच्या उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ झाला आहे
पहील्या फेरीत एकूण-29 टेबलवर 28 ग्रामपंचायत ची मतमोजणी करण्यात आली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने नाथरा, चांदापूर, बोधेगाव, दौंडवाडी, लोणारवाडी तेलसमुख, मैंदवाडी, वाघबेट, तेलघणा येथे सरपंच पदी विजय प्राप्त करून ग्रामपंचायती ताब्यात आणल्या आहेत तर जळगव्हान, लोणी, औरंगपूर, परचुंडी येथे माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलच्या ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे. मरळवाडी येथे अपक्ष पॅनेलने विजय प्राप्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरस्कृत पॅनलच्या विजयी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी तर भाजपच्या विजयी सरपंच व सदस्यांचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वागत केले आहे.
दरम्यान, तालुक्यातील गाजलेल्या कन्हेरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रासपाचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्या मातोश्री प्रभावती फड विजयी झाल्या आहेत. तर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या धर्मापुरी ग्रामपंचायतीवर परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एडवोकेट गोविंद फड यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी गोविंद फड याविजयी झाल्या आहेत,
तहसील कार्यालयासमोर जल्लोषपरळी तहसील कार्यासमोरील प्रांगणात विजयी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा एकच जल्लोष चालू आहे, गुलाल उधळून व पुष्पहार घालून नवीन सरपंच, सदस्यांचे स्वागत करण्यात येत आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचाकडेकोट बंदोबस्त आहे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कर पॅनल प्रमुखांना बळ दिले होते व गावात विकास कामासाठी निधी दिला होता व ते सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. दरम्यान विजयी जल्लोष करताना आ. धनंजय मुंडें यांनी 'मै हुं डॉन' गाण्यावर समर्थकांसह ठेका धरला.