परळी/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील बहुतांश जिल्ह्यात विविध उपक्रम साजरे करण्यात आले. तर, मुंबईतही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठा कार्यक्रम घेऊन शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला. राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनीही परळी शहरात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र हा कार्यक्रम संपल्यावर स्टेजवर चांगलाच गोंधळ उडाला. केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांची स्टेजवर झुंबड उडाली होती, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
धनंजय मुंडें यांनी आपल्या परळी मतदारसंघात अभिनेता गोविंदा यांच्या उपस्थितीत शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमात 81 किलोचा केक आणण्यात आला होता, तो गोविंदा आणि धनंजय मुंडेंच्या हस्ते कापण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानंतर स्टेजवरील केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. अक्षरशा धुलवड खेळल्यासारखं एकमेकांच्या तोंडाला केक लावण्याचा कार्यक्रम कार्यकर्ते करत होते. परळी शहरात मोंढा मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळकरी मुलांनी एकमेकांच्या तोंडावर केक मारायला सुरुवात केली, केक खाण्यासाठी गर्दी पाहून कार्यक्रमाच्या आयोजकांनी स्टेजवर धाव घेतली. त्यानंतर, परिस्थिती नियंत्रणात आली आणि तेथील गोंधळ थांबवला. मात्र, तोपर्यंत या केकच्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान 'माझ्या विनंतीस मान देऊन आलेले माझे मित्र गोविंदा (चीची भैय्या) यांचे परळीत स्वागत केले. परळीकरांच्या उपस्थितीत साहेबांचा वाढदिवस केक कापून व विविध सामाजिक उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा केला,' असे ट्विटही धनंजय मुंडेंनी केले आहे.
महाराष्ट्राचेच सर्वात मोठे योगदान
हिंदी चित्रपट सृष्टी उभी करण्यात महाराष्ट्राचेच सर्वात मोठे योगदान असे सांगून सिने अभिनेते गोविंदा यांनी परळी ही प्रभू वैद्यनाथ शिवजी यांची भूमी असून, येथे प्रामाणिक पणाने जनतेची सेवा करणारा माणूस नक्कीच ईश्वराच्या कृपेने मोठा होत असतो असा विश्वास त्यांनी येथें कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. खा. पवार साहेबांबद्दल बोलताना गोविंदा यांनी बॉलीवूड ही महाराष्ट्राची व मुंबईची देन असून याला उभं करण्यात पवार साहेबांसारख्या नेतृत्वाचा मोठा हातभार आहे. मुंबई अनेक उद्योग आणि विविधतेने नटलेले जागतिक दर्जाचे शहर असून याचा विकास करण्यात नेतृत्वाचा हातभार असल्याचे सांगितले.