माजलगाव (बीड ) : तालुक्यातील धर्मेवाडी येथील ग्रामस्थांना मागील दोन महिन्यांपासून पाणी टंचाईच्या ग्रासले आहे. टँकरसाठी त्यांनी प्रशासनास निवेदने देऊन मागील दोन महिन्यांपासून पाठपुरावा केला मात्र तरीही पाणी मिळाले नाही. यामुळे आज ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी पंचायत समिती समोर हांडे, घागर घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले.
धर्मेवाडी हे गाव दुष्काळाचा मागील दोन महिन्यांपासून सामना करत आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी माजलगाव पंचायत समितीकडे टँकरचा प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर गावकऱ्यांनी दिनांक 1 नोव्हेंबरला तलाठी कार्यालयावर निदर्शने केली, पुन्हा 13 नोव्हेंबरला तालखेड फाटा येथे रस्ता रोको, 5 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला त्यावर प्रशासनाने 25 डिसेंबर पर्यंत टँकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन आंदोलकांना दिले.
मात्र, अद्याप टँकर सुरू न झाल्याने आज गावकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी घागर, हांडे घेऊन पंचायत समिती आवारात ठिय्या मांडला. टँकर चालू केल्याशिवाय येथून हलणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. यावेळी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण , उपसभापती डॉ. वसीम मनसबदार तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी आंदोलकांना शांत करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच प्रस्ताव तहसील कार्यालयात मंजुरीसाठी पाठविला असल्याचे सांगितले. दरम्यान पंचायत समिती सभापती अलका नरवडे गट विकास अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. आंदोलन सुरू असतानाच त्यांनी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण यांना या प्रश्नी चांगलेच फैलावर घेतले.
यानंतर आंदोकांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळविला. येथे आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांचाकडे तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कशाप्रकारे प्रस्तावांची हेळसांड करत आहेत याचा पाढाच वाचला. आंदोलनात सुंदर चव्हाण , संतोष राठोड, महादेव सुरवसे, वैजनाथ हुंबे, विठोबा काळे, रेवणनाथ यादव, राजाभाऊ दरवेशी आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाणी प्रश्न बिकट आंदोलकांनी प्रथम मागणी करताच मी प्रस्ताव तयार करून टँकर लवकर सुरू करण्याबाबत गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांना सांगितले होते. मात्र, मागील दिड महिन्यांपासून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती उद्भवली - अल्का जयदत्त नरवडे,सभापती, पंचायत समिती