धारूर : धारूर ते आडस या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालक व प्रवासी वैतागले होते. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली असून, रस्त्याची डागडुजी सुरू झाल्याने, प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत. काम दर्जेदार करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
भुरट्या चोरांचा वावर वाढला
अंबाजोगाई : गाडीतील पेट्रोल, बॅटरी, पाण्याची मोटार, पाइप, वायर अशा कंपाउंडमधील वस्तूंच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील हद्दवाढ भाग, तसेच रहिवासी भागातील घरांच्या कंपाउंडमधील साहित्याच्या सर्रास चोऱ्या होत आहेत. या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांची अडचण सोडविण्याची मागणी
बीड : परळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंद केली होती, परंतु काही अडचणींमुळे बऱ्याच शेतकऱ्यांची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीकडे झाली नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांची तत्काळ नोंद घेऊन त्या शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. यासाठी बाजार समितीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
स्थानकासमोरील ‘नो पार्किंग’चा बोजबारा
धारूर : धारूर बस स्थानकासमोर वाहतूक पोलीस नसल्याने ‘नो पार्किंग’चा बोजबारा उडाला आहे. सर्रास या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने लावलेली असतात. त्यामुळे रहदारीला अडथळा होतो व पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ ‘नो पार्किंग’ची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.