विद्युत रोहित्रांना संरक्षण कठडे नाहीत
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विद्युत रोहित्राचे बॉक्स उघडे आहेत. संरक्षण कठड्यांचा अभाव असल्याने संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरातील विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड होते. उघडे फ्युज, तार व हे बॉक्स उघडेच असतात. या प्रकाराकडे महावितरणचे मोठे दुर्लक्ष होत आहे. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी रोहित्रांना संरक्षण कठडे अथवा भिंत बांधावी व कवाडे बसवावीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
पाणी उपलब्धतेने
रब्बी पिके जोमात
अंबाजोगाई : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिसरातील विहिरी, इंधन विहिरी, पाझर तलाव व विविध जलस्रोत तुडुंब भरले. परिणामी रब्बी हंगाम मोठ्या प्रमाणात बहरला आहे. हरभरा, गहू, ज्वारी, करडई ही पिकेही चांगली आली असून, परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पिके जोमात असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान दिसू लागले आहे. यावर्षी तरी समाधानकारक उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
साहित्याचे ढिगारे वाहतुकीला अडथळा
बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण ते टाकरवण फाटा रस्त्याच्या कडेला टाकलेले खडीचे ढिगारे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या ढिगाऱ्यामुळे रस्ता अरुंद होऊन अपघात होऊ लागले आहेत. एक तर रस्ता दुरुस्त करा किंवा रस्त्याच्या बाजूला टाकलेली खडी उचला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ढिगारे टाकण्यात आले; मात्र अद्यापही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. रस्ता दुरुस्त करून ढिगारे उचलण्याची मागणी आहे. परंतु, अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.