डॉ. स्वरुपसिंह हजारी हे भाजपचे धारुर येथील विद्यमान नगराध्यक्ष आहेत. त्यांचा शहरात खासगी दवाखाना असून ३१ ऑगस्ट रोजी शहरातील कसबा विभागातील १९ वर्षीय गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी आली होती. सोनोग्राफी करण्याच्या बहाण्याने डॉ. हजारी यांनी अश्लील चाळे केल्याचा आरोप पीडितेने केला. जातिवाचक उल्लेख करुन अपमानीत ही केले. याप्रकरणी पीडितेने धारुर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून रात्री ९ वाजता डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्यावर विनयभंग, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाला. शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून उपअधीक्षक विजय लगारे ठाण मांडून होते. दरम्यान, पीडित कुटुंबावर दबाव वाढत असून त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबूराव पोटभरे यांनी केली. पीडित कुटुंबास न्याय द्यावा, असेही ते म्हणाले.
....
शहर बंद, डॉक्टर असोसिएशनचे निवेदन
धारुर: नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्यावरील गुन्ह्याचे पडसाद १ सप्टेंबर रोजी शहरात उमटले. नगराध्यक्षांवर
हेतू पुरस्सर गुन्हा नोंद केल्याचा दावा करत समर्थकांनी १ सप्टेंबर रोजी बंदचे आवाहन केले. त्यास शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध संघटनांनीही गुन्हा मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. व्यापारी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अशोक जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सहायक निरीक्षक नितीन पाटील यांना निवेदन दिले. डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मयूर सावंत यांनीही गुन्ह्याचा निषेध नोंदविला.
....