अनिल महाजन
धारूर : शहरालगत सारूकवाडी रस्त्यावर असणारे केविड केअर सेंटर म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा असे वाटत आहे. सर्वच प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षतेमुळे येथील सर्व व्यवस्थापन ढासळले असून पाणी व स्वच्छालयाचे कारण सांगत या सेंटरवरील बाधित रूग्ण दिवसभर सर्रासपणे रस्त्यावर बसलेले दिसत आहेत. बाधितांच्या जत्रेचे हे स्वरूप संसर्गाचा धोका वाढविणारे ठरू शकते.
सारूकवाडी रस्त्यालगत दोन कोविड केअर सेंटर मंजूर आहेत. समाज कल्याणच्या वसतिगृहात १०० खाटांचे तर जि. प. शिक्षण विभाग मुलींच्या वसतिगृह इमारतीत ६० खाटांचे कोविड सेंटर मंजूर आहे. हा रस्ता हा रहदारीचा आहे. मात्र काेविड सेंटरमधील रूग्ण पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत रस्त्यावरच बसलेले तसेच फिरताना दिसून येतात. जि. प. वसतिगृहातील सेंटरमध्ये असलेले रूग्ण पाण्याची सोय नसल्याचे व स्वच्छालय व्यवस्थित नसल्याचे कारण पुढे करत हातात बाटली घेऊन सतत बाहेर फिरताना दिसतात. रूग्ण व त्यांचे नातेवाईक गप्पा मारताना दिसून येतात. यातमहिला व पुरूष रूग्णांचा समावेश आहे. दोन्ही सेंटरवर वैद्यकीय अधिकारी, नर्स, स्वच्छता कर्मचारी असा ३६ जणांचा ताफा नियुक्त आहे. सकाळी व संध्याकाळी तपासणी फेरी झाल्यास येथे नियूक्त सहा वैद्यकीय अधिकारी व जि. प. आरोग्य विभागाचे ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदारी दिलेली असताना कोणीच दिसत नाही.
रविवारी ही बाब लोकमतने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर धारूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुरेखा धस तात्काळ येथे आल्या. मात्र आरोग्य, महसूल, नगर परीषद प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याने त्याही हतबल झाल्या होत्या. गेटवरील होमगार्ड व आरोग्य विभागाचे कर्मचारी जि. प. वसतिगृहात पाण्याची समस्या असल्याने रूग्ण बाहेर जातात, असे सांगून मोकळे झाले. सारूकवाडी रस्ता परिसरात नियमित जाणारे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी कोविड केंद्रातील रूग्णांचा बाहेर होणारा वावर तात्काळ थांबवावा, अशी मागणी केली.
रूग्णांचे बाहेर फिरणे बंद करु
धारूर येथील कोविड केअर सेंटरच्या इमारतीत पाण्याचा प्रश्न आहे. तो मार्गी लावण्यासाठी नगरपरीषद कार्यालयास पत्र दिले असून पाणीप्रश्न मार्गी लागताच येथील रुग्णांचे बाहेर येणे बंद केले जाईल. - डाॕॅ. स्वाती डिकले, तालूका आरोग्य अधिकारी.
पाणी व स्वच्छालयाचा प्रश्न मार्गी लावू
कोवीड सेंटरवरील स्वच्छालय व पाण्याच्या प्रश्नाबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ कळविले असून सोमवार येथील पाणी प्रश्नमार्गी लागेल. येथील रूग्ण बाहेर येणार नाहीत, यासाठी सेंटरवर नियुक्त कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. वंदना शिडोळकर, तहसीलदार, धारूर.
===Photopath===
160521\img_20210516_111717_14.jpg~160521\img_20210516_111550_14.jpg