एकूण ५९ ग्रामपंचायती असलेल्या पाटोदा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या ७३ जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणूक निकालात दासखेड, पारगाव घुमरा, ढाळेवाडी ग्रामपंचायतींत आ. धस यांचे समर्थक व पाटोदा पं. स. चे माजी सभापती केशव रसाळ यांनी विजयश्री मिळविली. दासखेडच्या ११ पैकी सात जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे, तर पारगाव घुमरा ग्रामपंचायतीत आ. बाळासाहेब आजबे यांचे समर्थक दीपक घुमरे यांना ९ पैकी केवळ एकच जागा मिळवता आली. आ. सुरेश धस यांचे समर्थक हरिबाप्पा घुमरे यांनी ५ जागा मिळवून ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले. ढाळेवाडी ग्रामपंचायतीत सात जागांपैकी पंचायत समितीचे माजी सभापती तात्यासाहेब हुले यांना चार जागा मिळाल्या असल्या तरी श्याम हुले यांच्या गटाने तीन जागांवर विजय मिळविला आहे. उखंडा ग्रामपंचायतीत प्रल्हाद झुणगुरे यांनी ७ पैकी ५ जागा जिंकून वर्चस्व मिळविले. डोंगरकिन्ही गटाचे जि. प. सदस्य प्रकाश कवठेकर यांना केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. खडकवाडीत प्रदीप सानप गटाला सहा जागा मिळाल्या. काकडहिरा ग्रामपंचायतीत ॲड. विनोद जायभाये यांना नऊपैकी आठ, निरगुडीत संतोष बेंद्रे यांना पाच, तर हनुमंत शेलार यांच्या गटाला चार जागा मिळाल्या. बेदरवाडीत माजी सरपंच बेदरे यांच्या गटाला ७ पैकी ७ जागा मिळाल्या. अनपटवाडी ग्रामपंचायतमध्ये आ. धस यांचे समर्थक गणेश भोसले यांनी सातपैकी सात जागा मिळवून माजी आ. भीमराव धोंडे यांचे समर्थक पाटोदा पं. स. चे माजी सभापती सेनापती जायभाये यांच्यावर मात केली.
आता सरपंच आरक्षणाकडे लक्ष
या ग्रामपंचायतीसाठी मतदान होऊन निकाल जाहीर झाला. आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. मात्र, आता सरपंच कोण होणार ? हे सरपंच पदाचे आरक्षण झाल्यानंतर ठरणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या आरक्षणाकडे लागले आहे.