आष्टी : एकाच पक्षात राहून राजकीय चिखलफेक करणे हे नवनिर्वाचित आमदारांनी थांबवावे आणि खोटे बोल पण रेटून बोल ही वृत्ती बंद करावी. अन्यथा पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याचा इशारा आ. भीमराव धोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
तालुक्यातील मातावळी ते हरिनारायण आष्टा, दौलावडगाव ते सावरगाव या दोन रस्त्यांना मंजुरी आणल्याचा दावा करत आ. सुरेश धस यांनी आ. धोंडे यांना टोला लगावला होता. त्यानंतर आ. धोंडे यांनीही पत्रकार परिषदेत तत्वत: मंजुरीचे कागदपत्र सादर करत आ. धस यांचा मुद्दा खोडून काढला. ते म्हणाले, राज्य व केंद्र सरकारने तालुक्यातील पाच रस्त्यांना तत्वत: मान्यता दिलेली असून अद्याप कोणत्याही रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालेली नाही.
चिंचपूर ते खडकत रस्ता, आल्हनवाडी ते वाकी रस्ता, लोणी ते सावरगाव, हिंगणी ते चिखली, दौलावडगाव ते सावरगाव घाट या रस्त्यांबाबत आम्ही सादर केलेल्या प्रस्तावास ६ मे २०१७ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वत: मंजुरी दिलेले अधिकृत पत्र माझ्याकडे आहे. त्यामुळे आ.धस यांनी पुरावा सोबत ठेवून पत्रकार परिषद घ्यावी असा सल्ला आ. धोंडे यांनी दिला.
२०१७ मध्ये धस हे आमदार नसताना मतदार संघातील रस्त्यांना मंजुरी कशी मिळते, असा प्रश्न करुन, गत चार वर्षापासून मी विधानभवनात मतदार संघाचे नेतृत्व करून शंभर पेक्षा जास्त प्रश्न विचारले. आ. धस यांनी एक-दोन प्रश्न विधानभवनात विचारले असतील. जर आ. धस यांनी ही चिखलफेक तात्काळ थांबवली नाही तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल व पक्ष श्रेष्ठींकडे तक्र ार करणार असल्याचे ते म्हणाले.