- अविनाश कदम
आष्टी : आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तिन्ही नगर पंचायतीच्या निवडणुका तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आ. भीमराव धोंडे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी त्यांनी विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे आगामी नगर पंचायत निवडणुकीसाठी नेतृत्वाचे वेगळे समीकरण पाहायला मिळेल असे संकेत मिळत आहेत.
माजी आमदार भीमराव धोंडे यांनी गुरुवारी मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना गहिनीनाथ गड येथील पुण्यतिथी सोहळयास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले. यानंतर शुक्रवारी त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दरम्यान, मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, ही भेट आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर झाल्यामुळे मतदार संघात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीमुळे भारतीय जनता पार्टी आगामी तिन्ही नगर पंचायतीच्या निवडणुका माजी आ. भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली लढविणार असल्याचे सूचित होत आहे.
धस की धोंडे ? कोण करणार नेतृत्व आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायत वर सध्या प्रशासक आहेत. येथील निवडणूका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत भाजपचे विधान परिषदेचे आ. सुरेश धस आणि माजी आमदार भिमराव धोंडे यांचे दोन पॅनल असतील हे उघड आहे. यामुळे तिन्ही निवडणुकीत भाजप धस की धोंडे या दोघांपैक्की कोणावर विश्वास टाकत त्याच्या गटाला एबी फॉर्म देऊन नेतृत्व करण्याची संधी देणार यावर चर्चा रंगत आहेत. यामुळेच माजी आमदार भिमराव धोंडे भाजपचे विरोधी पक्षनेते फडणवीस आणि प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट लक्षवेधी ठरत आहे.