लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोना सुरु झाल्यापासून आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात तब्बल २३१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. पैकी १४७ मयतांना आगोदरच कोमॉर्बिड आजार होते तर ८४ लोकांचा केवळ कोरोनामुळे मृत्यू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या ऑडीटमधून हा प्रकार समोर आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच कोरोनामुक्तीचा टक्काही ९० च्या घरात असल्याने दिलासा मिळत आहे. असे असले तरी जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल पावणेनऊशे रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मृत्यू झाला आहे. या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून डेथ ऑडीट केले जाते. यामध्ये फिजिशियनसह वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञांचा समावेश असतो.
याच समितीच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात मृत्यू पावलेल्या २३१ पैकी केवळ ८४ लोकांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे. इतर १४७ मृत्यू हे त्यांना आगोदरच कोमॉर्बिड आजर असल्याने झाल्याचे सांगण्यात आलेले आहे.
दरम्यान, ज्या लोकांचे वय ५० पेक्षा अधिक आहे, किंवा त्यांना मधूमेह, उच्च रक्तदाब आदी गंभीर आजार आहेत, अशांनी वारंवार तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्यानूसार तात्काळ उपचार करावेत. कारण आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीतून ५० पेक्षा जास्त वय असलेले आणि कोमॉर्बिड आजार असलेल्यांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वांनी दुखणे अंगावर न काढता तात्काळ उपचार करावेत.
अतिजोखमीच्या व्यक्तंनी काय करावे?
अतिजोखमीच्या व्यक्तिंचा सध्या आरोग्य विभाग शोध घेत आहे. तसेच यापूर्वी देखील सर्वेक्षण करुन माहिती घेण्यात आलेली आहे. याबाबत कोमॉर्बिड आजार असलेल्यांना थोडाही त्रास झाला की रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. परंतू ते जात नाहीत. कोमॉर्बिड आजार असलेल्या रुग्णांनी वारंवार तपासणी करुन वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.