बीड : पोलिसांचे तत्काळ साहाय्य हवे असल्यास आतापर्यंत १०० हा हेल्पलाइन क्रमांक होता. तो आता बदलला जाणार असून, त्याऐवजी ११२ या क्रमांकावरून पोलिसांची मदत घेता येणार आहे. दरम्यान, डायल ११२ या हेल्पलाइन सुविधेची सध्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात ‘ट्रायल’ सुरू आहे.
डायल ११२ या हेल्पलाइन सुविधेद्वारे नागरिकांना तत्काळ पोलिसांचे साहाय्य व्हावे, यासाठी १५२ दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय पिंक मोबाइल पथकाद्वारे महिलांना साहाय्य केले जाणार असून, त्यासाठीदेखील स्वतंत्र चारचाकी वाहने देऊन महिला अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या वाहनांचा लोकार्पण सोहळा २२ जून रोजी पोलीस मुख्यालयावर पार पडला. दरम्यान, जिल्ह्यात २८ पोलीस ठाणे असून, आपत्कालीन स्थितीत नागरिकांना पोलिसांची मदत घेण्यासाठी १०० हा क्रमांक डायल करावा लागत होता. त्याऐवजी आता ११२ डायल करून पोलिसांची मदत घेता येणार आहे. ११२ वर कॉल केल्यानंतर सेंट्रलाइज कंट्रोल रूमला अवघ्या काही सेकंदांत कॉल कोठून आला, ते संबंधितांना कळेल. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशामक दल, महिला हेल्पलाइन, चाइल्ड हेल्पलाइन यांना एकाचवेळी या कॉलची माहिती देतील. घटनेचे गांभीर्य ओळखून आवश्यकतेनुसार मदत करणे सोयीचे होणार आहे. दरम्यान, डायल ११२ हेल्पलाइन सुरू होणार असल्याने अधिकारी व अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली असून, नियंत्रण कक्षातून २४ तास कामकाज चालणार आहे. त्यासाठी ९ प्रशिक्षित अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे.
....
पहिल्या दिवशी नाही एकही कॉल
दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी बीड व अहमदनगर जिल्ह्यात डायल ११२ हेल्पलाइन सुविधेची ट्रायल घेण्यात आली. दिवसभरात बीडमधून एकही कॉल आला नाही. २ ऑक्टोबर रोजी सर्वत्र एकाचवेळी ही सुविधा सुरू होणार आहे. त्यासाठी युद्धपातळीवर नियोजन सुरू
आहे.
------------
डायल ११२ या हेल्पलाइनवर कॉल केल्यावर जलदगतीने संबंधितांच्या मदतीला पोलीस धावून जाणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षित अंमलदारांची नेमणूक केली आहे. २ ऑक्टोबर रोजी ही सुविधा सुरू होणार आहे. त्यासाठी सध्या ट्रायल घेेणे सुरू आहे.
-ज्ञानेश्वर कुकलारे, सहायक निरीक्षक व नोडल ऑफिसर, डायल ११२
.....