बीड - राज्यात एकीकडे भोंग्याचा वाद सुरू असून मनसैनिक हनुमान चालिसा वाजविण्यावर ठाम आहेत. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसेचे नेते मंदिरावर भोंगे लावून हनुमान चालिसा वाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासदार प्रितम मुंडेंनी बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर नूतन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली.
बीड जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचार आणि कायदा व सुव्यवस्थेच्या घटनांवर प्रितम मुंडेंनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. आज खासदार मुंडे यांनी नूतन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा केली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक आर. राजा स्वामी यांचा कार्यकाळ हा वादग्रस्त ठरला होता. विशेष म्हणजे याच प्रश्नावर विधिमंडळात देखील चर्चा झाली होती. अखेर त्यांच्या बदलीनंतर पंकज देशमुख यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. दरम्यान, आज खासदार मुंडे यांनी त्यांची भेट घेऊन महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत चर्चा केली. मागील काही दिवसांमध्ये बीड आणि परळीमध्ये महिलांवर सामूहिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.
जिल्ह्यातील या अत्याचाराच्या घटनांवर खासदार मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात महिलांविरोधात गुन्हेगारी वाढली असून सामुहिक बलात्काराच्या घटना देखील वाढत आहेत. या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. दिवसा-ढवळ्या खून दरोड्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा यावर वचक दिसत नाही, पोलिसांनी यावर वचक बसवला पाहिजे, अशी मागणीदेखील मुंडे यांनी केली. सरकार कोणाचेही असो पोलिसांनी आपलं काम नि:पक्षपातीपणे केलं तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राखण्यास मदत होईल, अशी भावनाही मुंडे यांनी व्यक्त केली आहे.