भाजप तालुकाध्यक्ष सतीश मुंडे : रस्त्यांच्या निधींचा श्रेयवाद
परळी : पंकजा मुंडे आणि खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची पालकमंत्री धनंजय मुंडे यांची जुनीच सवय आहे. आताही त्यांनी तेच केले आहे, मुंडे भगिनींचे कामाचे श्रेय घेणाऱ्या पालकमंत्र्यांनी राज्य सरकारकडून फुटकी कवडी तरी आणली का? अशी टीका भाजपचे परळी तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी केली आहे.
परळी - गंगाखेड रस्त्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी प्रयत्न करून २२४ कोटी रुपये आणले, याशिवाय बीड शहरातून जाणाऱ्या व जिल्ह्यातील इतर रस्त्याकरता देखील मोठा निधी आणला. यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केला होता. गडकरी यांनी त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ देत हा निधी मंजूर केला. केंद्रात भाजपचे सरकार आहे, जिल्ह्याचा खासदार भाजपचा आहे, दिलेला निधी केंद्र सरकारचा आहे, असे असताना पालकमंत्र्यांनी फुकटचे श्रेय लाटू नये. पंकजा मुंडे यांनी सत्तेत असताना परळी मतदारसंघात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला होता व त्याच निधीतून आताही कामे चालू आहेत. परंतु, पालकमंत्री मात्र आपणच हे सर्व केल्याची नाटके करत आहेत. खरचं तुमच्यामध्ये विकासाची एवढी तळमळ आहे तर मग राज्य सरकारकडून आपण सत्तेत आल्यानंतर किती निधी आणला ? हे जनतेला सांगावे, असे आव्हान तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी केले आहे.