बीड : दिव्यांगत्व टक्केवारीत तफावत आढळल्याने २३ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ५२ शिक्षकांना निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. यानंतर प्राप्त अहवालानुसार आणखी संशयित दिव्यांग २६ शिक्षकांना ३१ जानेवारी रोजी सुनावणीनंतर निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी याबाबत आदेश जारी केले. आतापर्यंत एकूण ७८ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी याबाबत दुजोरा दिला.
प्राथमिक शिक्षक संवर्गातील सर्वसाधारण बदल्यांतर्गत शिक्षक, कर्मचारी, कर्मचाऱ्यांचे पाल्य, नातेवाईकांनी त्यांच्याकडील दिव्यांग प्रमाणपत्रानुसार स्वारातीमध्ये अपंग मंडळापुढे वैद्यकीय पुनर्तपासणीनंतर अहवाल आला होता. ऑनलाईन बदली प्रक्रियेच्या अर्जासोबत दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीमध्ये आणि अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून पुनर्तपासणी होऊन आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र पुनर्तपासणी अहवालातील दिव्यांग टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने ५२ शिक्षकांना निलंबित केले होते. आता पुन्हा २६ शिक्षकांच्या दिव्यांगत्वातही तफावत आढळल्याने बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
माजलगावचे ६, गेवराई, पाटोदा, परळीचे ४-४हरिभाऊ रामभाऊ गोरवे, रहिमुद्दीन नझीरूद्दीन सय्यद, महेश बळीराम नरवडे, शितल तुकाराम जावळे (गेवराई) , जयराम विश्वनाथ मांगडे (केज), वनिता तुकाराम जाधव, स्वाती आसराम भोंडवे (शिरूर), परमेश्वर आसाराम बिडवे, प्रियांका श्रावण केदार, अर्चना कचरू टाकणखार (वडवणी), विजय बाबासाहेब गर्जे (आष्टी), रखमाजी ज्ञानोबा कोल्हे,, रमेश तुळशीराम डोरले, निर्मला प्रल्हाद सोळुंके, शंकर किसन देवकते, पवनराज भगवानराव देशमुख, अप्पासाहेब नामदेव भोसले (माजलगाव) , गंगाधर निवृत्ती कांबळे, अंगद कोंडिबा घुले, संजय ज्ञानोबा पडोळे, अब्दुल करिम अब्दुल गफार कुरेशी (परळी), प्रकाश बलभीम भोसले, रामदास लिंबाजीराव साबळे, आशाबाई भगवानराव अडकर, अर्चना उत्तमराव धोंडे (पाटोदा), सुनिता तुकाराम गोडसे (बीड)