बीड : उसाच्या भावासाठी एकीकडे शिवसेना दिवसेंदिवस आक्र मक होत चालली आहे, तर दुसरीकडे शेतकरी संघटना देखील वेगवेगळ्या आंदोलनांद्वारे कारखानदारांचे ऊस उत्पादक शेतक-यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आंदोलनाशी कांहीही देणे-घेणे नसलेल्या कारखानदारांची दुकानदारी चालूच राहिल्यामुळे अखेर शेतकरी आंदोलन हे आता वेगळ्या दिशेकडे वळत असून, शेतकरी संघर्ष समितीने माजलगाव येथील परभणी फाटा रस्त्यावर टायर जाळून शुक्रवारी आंदोलन केले.
माजलगाव, धारूर तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखान्यांनी खाजगी साखर कारखान्यांपेक्षा गतवर्षी प्रतिटन ६०० रुपये कमी दराने रक्कम दिलेली आहे. ही ६०० रुपयांची रक्कम शेतक-यांना तात्काळ अदा करण्यात यावी, उसाचा दर तात्काळ जाहीर करावा, तसेच २६५ जातीच्या उसाची नोंद कारखान्यांना घेण्यात यावी आदी मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग परभणी टी पॉइंट येथे अडविण्यात आला. यावेळी आंदोलक आक्रमक झाले होते.
आंदोलकांनी रस्त्यावरून वाहतूक करता येऊ नये म्हणून रस्त्यावर टायर जाळून ठेवले होते. त्यामुळे परभणी टी पॉइंटला मिळणाºया तिन्ही रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. महामार्ग अडविल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.