पुरुषोत्तम करवा
माजलगा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनची कमतरता असल्याने, शासनाने ज्या ठिकाणी ऑक्सिजन वापरण्यात येतो, तेथील ऑक्सिजन सिलिंडर ताब्यात घेतले. याचा परिणाम आता पाहावयास मिळू लागला असून, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती ऑक्सिजनशिवाय होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याने, त्यांच्यावर संबंधित कार्यालयात खेटे मारण्याची वेळ आली आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. सध्या रुग्णांना ऑक्सिजन लागत असल्याने, महाराष्ट्रात शासन ज्या ठिकाणी ऑक्सिजनचा वापर होतो, त्या ठिकाणचे ऑक्सिजन सिलिंडर ताब्यात घेत आहे. साखर कारखाने, दुकानात विविध कामांसाठी वापरात असलेले, ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या व इतर ठिकाणांवरून ऑक्सिजन सिलिंडर तहसीलदारांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आले, तर अनेक ठिकाणचे ऑक्सिजन सिलिंडर ताब्यात घेण्यात येत आहेत.
यामुळे ऑक्सिजनअभावी साखर कारखाना व इतर ठिकाणाची कामे खोळंबली आहेत. याचा परिणाम विविध क्षेत्रांवर दिसू लागला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने व बागायती शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी दयावे लागते. याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मर जळतात व ते दुरुस्तीसाठी आणि भरण्यासाठी ऑक्सिजन लागत असते. सध्या ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करणाऱ्या वेगवेगळ्या एजन्सीकडे असलेले ऑक्सिजन सिलिंडर शासनाने ताब्यात घेतल्याने ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीत मोठ्या अडचणी येत आहेत.
जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेत मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना संबंधित विभागाच्या कार्यालयाकडे खेटे मारण्याची वेळ येत आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर शेतकऱ्याला किंवा गावात २-३ दिवसांच्या आत ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होत असे, परंतु सध्या हे ट्रान्सफॉर्मर १५ दिवस उलटूनही मिळत नसल्याने आणखी किती दिवसात हे ट्रान्सफॉर्मर मिळेल, याची शाश्वती नसल्यामुळे नागरिकांना उकाड्यात राहण्याची वेळ आली आहे, तर शेतातील पिके करपू लागली आहेत.
सध्या ऑक्सिजनअभावी वेगवेगळ्या एजन्सीला ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीत मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. जसजसे ट्रान्सफॉर्मर मिळतील, तसतसे ते शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना देण्यात येईल.
--- सुहास मिसाळ, उपविभागीय अधिकारी, महावितरण कंपनी माजलगाव