शिरूर कासार : शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी तालुक्यातील दिंड्या पालखी मार्गावरून ‘भानुदास एकनाथ’च्या गजरात मार्गस्थ झाल्या आहेत. हजारो वारकरी तळपत्या उन्हाची पर्वा न करता पायी प्रतिष्ठाननगरीकडे निघाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, शुक्रवारी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त सिद्धेश्वर संस्थानवर महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांचे कीर्तन झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला .सालाबादप्रमाणे यंदाही सिद्धेश्वर संस्थानवर तुकाराम बीज साजरी करण्यात आली. प्रतिमापूजन करु न ‘आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ।।’ या अभंगातून तुकाराम चरित्र कथा सांगून मानव जातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. त्यानंतर अर्जुन गाडेकर, भाऊसाहेब गाडेकर, व कमलाकर वेदपाठक यांनी महाप्रसाद दिला . पुढील तीन वर्षांकरिता अशोक गायकवाड, गोपीचंद गाडेकर व भाऊसाहेब गाडेकर यांनी नारळ घेउन यजमानपद स्वीकारले आहे .वारकरी सांप्रदायाचा पाया संत ज्ञानदेवांनी रचला. त्याचा खांब एकनाथ महाराज, तर विस्तार नामदेवांनी केला आणि कलशस्थानी जगद्गुरू तुकाराम महाराज असा वारकरी संप्रदाय आज विशाल स्वरूप धारण करून जगाचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. दुष्काळाचे ऊग्र रूप सर्वत्र भेडसावत असले तरी संत भेटीची उत्कंठा अधिक असल्याने ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता वारकरी कष्ट सोसत आळंदी, पंढरपूर, देहू, त्र्यंबकेश्वर, पैठण आदी सांप्रदायिक अधिष्ठान आणि त्यावरची निष्ठा जतन करत असल्याचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी सांगितले.भक्तीचा जागर : पाऊले चालती पैठणची वाटबीजोत्सव साजरा करून वारकरी पैठण नगरीकडे मार्गस्थ झाले. तालुक्यातून कान्होबाची वाडी येथून श्रीरंग महाराज, गोमळवाडा येथून भानुदास महाराज आदी दिंड्यांशिवाय श्रीक्षेत्र भगवान गडावरून, गहीनाथ गडावरून जाणाऱ्या मोठ्या दिंड्यांसोबत हजारो वारकरी व श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरील महंत स्वामी निगमानंद महाराज यांच्या दिंडीबरोबर देखील वारकरी निघाले आहेत.खांद्यावर भगव्या पताका, हातात टाळ, गळ्यात वीणा, सहभागी महिलांच्या डोईवर तुळसी वृंदावन असे चित्र पहावयास मिळते आणि न कळत पाहणारा देखील हात जोडत भानुदास एकनाथ म्हटल्याशिवाय रहात नाही.
नाथषष्ठीसाठी दिंड्या पैठणकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:29 AM
शिरूर कासार : शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी तालुक्यातील दिंड्या पालखी मार्गावरून ‘भानुदास एकनाथ’च्या गजरात मार्गस्थ झाल्या ...
ठळक मुद्देपालखी मार्गावर ‘भानुदास-एकनाथ’चा गजर : महंत स्वामी विवेकानंदशास्त्री यांचे शिरूरमध्ये कीर्तन