प्लास्टिकमुळे शेती सुपीकतेला धोका
वडवणी : शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतात शेणखत टाकले जाते. परंतु या शेणखतामध्ये प्लास्टिक, काचा व इतर काही वस्तू असतात. त्यामुळे शेतीच्या सुपीकतेला धोका पोहोचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात केवळ शेणखतच टाकावे. प्लास्टिक येत असेल तर असे प्लास्टिक शेणखताजवळ ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
रेतीचे दर वाढल्याने बांधकामात अडचणी
धारुर : तालुक्यात गेल्या दोन वर्षांत रेतीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम करण्यास मोठ्या अचडणी येत आहेत. पंधरा ते सोळा हजार रुपयांना मिळणाऱ्या रेतीच्या गाडीसाठी आता ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूच्या किमती दुपटीने वाढल्याने बांधकामात मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत.
कित्येक महिन्यांपासून घरकुलांचे हप्ते थकले
बीड : कित्येक महिन्यांपासून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते नगरपरिषदेकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात आलेले नाहीत. याबाबत वारंवार मागणी करूनही आश्वासनाशिवाय दुसरे काहीही लाभार्थींना मिळत नाही. तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.
काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० किमी रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहन चालकांनी केली आहे, परंतु याकडे लक्ष दिलेले नाही.