गेवराई तहसिलदारांचा आदेश डावलणे अंगलट
तहसीलदारांचा आदेश डावलल्याने गुन्हा दाखल
गेवराई : नैसर्गिक आपत्ती काळात तहसीलदार सचिन खाडे यांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहून दक्षतेचे निर्देश दिले होते. मात्र, तलाव पूर्ण भरल्यानंतर परिसरातील लोकांना पुराचा धोका असताना मोबाइल बंद करून निष्काळजी केल्याने ग्रामसेवकासह लिपिकावर ५ सप्टेंबर रोजी तलवाडा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. यामुळे ग्रामसेवक व लिपिकावरच आपत्ती आल्याची चर्चा आहे.
तलवाडा येथील ग्रामसेवक विजयकुमार मस्के व लिपिक तुळशीराम वाघमारे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. तलवाडा परिसरात अतिवृष्टी झाल्याने पाझर तलाव फुटण्याची शक्यता होती. त्यामुळे ग्रामसेवक मस्के, लिपिक वाघमारे यांना मुख्यालयी थांबण्याचे निर्देश तहसीलदार सचिन खाडे यांनी दिले होते, परंतु स्वतः खाडे व तलाठी सुभाष वाकोडे, मंडळाधिकारी अमोल कुरुलकर, कोतवाल गजानन शिंगणे हे ५ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता तलावास भेट देण्यासाठी गेले. यावेळी ग्रामसेवक मस्के व लिपिक वाघमारे हे गावात हजर नव्हते. त्यांनी तहसीलदार यांचा आदेश डावलला म्हणून तलाठी सुभाष वाकोडे यांनी तलवाडा ठाण्यात तक्रार दिली. यावरून ग्रामसेवकासह लिपिकाविरुद्ध नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.