बीड : तालुक्यातील वासनवाडी शिवारातील पारधी वस्तीवरील पंतप्रधान घरकुल आवास योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे बांधून देण्याचे आदेश देण्यात यावेत, या मागणीसाठी १६ कुटुंबांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या सुरेखा शिवाजी पवार यांची सोमवारी पहाटे उपोषणस्थळीच प्रसूती झाली. एका गोंडस मुलीला त्यांनी जन्म दिला.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वासनवाडी येथील सुबराव मोतीराम काळे व इतर १६ कुटुंब हे १५ मार्च पासून उपोषणाला बसले आहेत. वासनवाडी शिवारातील पारधी वस्तीवरील पंतप्रधान घरकुल आवास योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे बांधून देण्याचे आदेश देण्यात यावेत, या मागणीसाठी सुरू असलेल्या १६ कुटुंबांच्या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. सुरेखा पवार यांची सोमवारी पहाटे उपोषणस्थळीच प्रसुती झाली. या महिलेने नवजात मुलीसह उपोषणस्थळीच थांबण्याचा निर्णय घेतला असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेतला आहे. हा प्रकार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘अन्नत्याग’ उपोषणासाठी बसलेल्या शेतकऱ्यांमुळे उघडकीस आला. त्यांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली.
जिल्हाधिका-यांच्या पत्राला केराची टोपलीउपोषणाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून उपोषणार्थ्यांच्या मुद्यांबाबत तात्काळ चौकशी करुन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, तसेच संबंधितांस उपोषणापासुन परावृत्त करावे, अशा सूचना दिल्या होत्या. तरीही जिल्हा परिषद प्रशासनाने या पत्राकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.