कर्कश हॉर्नवर बंदी घाला
अंबाजोगाई : शहरातील अनेक युवकांच्या दुचाकींना कर्कश हॉर्न बसिवण्यात आले आहेत. रस्त्याने जाताना व गर्दीच्या ठिकाणी हे युवक मुद्दामहून हे हॉर्न वाजवतात. या विचित्र आवाजाच्या हॉर्नमुळे समोरच्याला भीती वाटावी, असे हे कर्णकर्कश आवाज असतात. याचा नागरिकांनाही मोठा त्रास होतो. शहर वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन अशा हॉर्नवर बंदी घालावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सुलभा सोळंके यांनी केली आहे.
स्वच्छतागृहांचा अभाव
अंबाजोगाई : शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहरात अनेक मुख्य रस्त्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे बाहेरगावांहून आलेल्या नागरिकांची व महिलांची मोठी गैरसोय होते. यामुळे शहरात मुख्य रस्त्यावर प्रशासनाने स्वच्छता गृहाची उभारणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरुण सोमवंशी केली आहे.
ऑनलाइनचा बोजवारा
अंबाजोगाई : लॉकडाऊनच्या स्थितीमुळे व दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. इयत्ता नववी ते बारावी या वर्गाच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. या विद्यार्थ्यांचा सर्व अभ्यासक्रम व अभ्यास ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहे. ऑनलाइन शिक्षण घेत असताना वीज पुरवठा, इंटरनेट कनेक्शनचे मोठे अडथळे निर्माण झाल्याने ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडाल्याने विद्यार्थी व पालक हैराण झाले आहेत.
गॉगल्सची विक्री वाढली
अंबाजोगाई : उन्हाची तीव्रता अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस वाढू लागली आहे. वाढत्या उन्हाचा डोळ्याला त्रास होऊ नये व डोळ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी विविध रंगांचे आकर्षक गॉगल्स बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अशा गॉगल्सची खरेदी युवकांकडून मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. बाजारात विविध आकारांच्या फ्रेम्स, सूर्यकिरण रोधक काचांच्या गॉगल्सना मागणी आहे.