बीड : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केली, असे सांगणारे आप्पासाहेब जाधव यांची जिल्हाप्रमुख (पूर्व) पदावरून पक्षाने हकालपट्टी केली होती. आता त्यांच्या जागेवर केजचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे यांच्या सोबतच परळीचे व्यंकटेश शिंदे आणि वडवणीचे माजी तालुका प्रमुख विनायक मुळे यांच्या नावाचीही जिल्हाप्रमुख पदासाठी चर्चा होती.
सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात राज्यभर महाप्रबोधन यात्रा काढण्यात आली. बीडमध्ये २० मे रोजी या यात्रेचा समारोप झाला. परंतू त्याच्या आगोदरच अंधारे आणि तेव्हाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात वाद झाला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून पैसे मागत असून सध्या दादागिरी करणाऱ्या अंधारेंना आपण दोन चापटा मारल्या असा दावा जाधव यांनी केला होता. अंधारे यांनी अवघ्या काही तासांतच सोशल मीडियातून असे काही घडलेच नसून हा केवळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट होता, असे सांगितले. परंतू या घटनेची पक्षाने गंभीर दखल घेत अवघ्या काही तासांतच जाधव यांची जिल्हाप्रमुख पदासह पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे हे पद सध्या रिक्त आहे. हेच पद भरण्यासाठी ठाकरे गटाकडून चांगला चेहरा शोधला जात होता.
इच्छूकांची यादी जरी लांबलचक असली तरी केजचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, परळीचे व्यंकटेश शिंदे आणि वडवणीचे माजी तालुका प्रमुख विनायक मुळे यांची नावे आघाडीवर होती. तसेच माजलगावचे माजी तालुका प्रमुख सतिश सोळुंके, अंबाजोगाईचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी यांच्याही चर्चा होती. अखेर केजचे तालुकाप्रमख रत्नाकर शिंदे यांच्या गळ्यात जिल्हाप्रमुख पदाची माळ पडली आहे.