अंबाजोगाई : सकाळच्या वेळी अंगण झाडत असलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या शेजाऱ्यास अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या. सी.एम. खारकर यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
विनयभंगाची ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील तळणी येथे घडली होती. येथील ३० वर्षीय पिडीता दि. २ मार्च २०१८ रोजी सकाळी ७ वाजता स्वत:च्या घरासमोरील अंगण झाडत असताना तिच्या घराशेजारी राहणाऱ्या भरत नागनाथ गायकवाड याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात भरत गायकवाड याच्यावर कलम ३५४ (अ)(i) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस हे.काॅ. सुधाकर केंद्रे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या. सी.एम. खारकर यांच्या न्यायालयासमोर झाली. सर्व साक्षी पुरावे लक्षात घेऊन न्या. खारकर यांनी आरोपी भरत गायकवाड याला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याप्रकरणात फिर्यादीच्या वतीने सहा. सरकारी अभियोक्ता आरती निळेकर यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. एस.बी. गायकवाड आणि ॲड. एन.बी. केंद्रे यांनी सहकार्य केले.