बीड : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातून आलेल्या स्थगितीमुळे समाजामध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्य सरकार गेल्या ५-६ दिवसांपासून पोकळ आश्वासन देत असून कोणताही निर्णय घेत नाही. राज्यभरातील मराठा संघटना, समन्वयकांमध्ये सध्या एकवाक्यता दिसून येत नाही. या एकवाक्यतेसाठी सर्वांना एका व्यासपीठावर घेऊन आरक्षण आंदोलनात छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केले.
बीड येथील शिवसंग्राम भवन येथे मंगळवारी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते म्हणाले की, शिवसेना हा आरक्षणाला विरोध असणारा पक्ष असून, या पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जाणीवपूर्वक विरोध आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी व थोरात यांची काँग्रेस हे प्रस्थापित लोकांचे पक्ष आहेत. यांना विस्थापित मुलांना प्रवाहात येऊ द्यायचे नाही. गरीब मराठा युवकांची वाताहत या तीन पक्षांच्या सरकारमुळे झाल्याचे ते म्हणाले.
अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाहीमुख्यमंत्री व अशोक चव्हाणांकडून पोकळ आश्वासने दिली जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील कधीही मराठा आरक्षणावर बोलत नाहीत. समाज त्यांना मानतो. मात्र, समाजासाठी ते बोलायला देखील तयार नाहीत. राज्य सरकारने आरक्षणावर लवकर निर्णय घ्यावा, समाजाला न्याय द्यावा अन्यथा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचे मेटे म्हणाले.