जातेगाव : गावभर चक्कर मारल्यानंतर सकाळी १० वाजता साेबत जेवण केले. त्यानंतर दोघा नवरा बायकोमध्ये टोकाचे भांडण झाले. यात दोघांनीही राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरात उघडकीस आली.
राजू बंडू चव्हाण (वय ३१) व सोनाली राजू चव्हाण (वय २८, रा. जातेगाव, ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. राजू हे नाशिकला असतात. मागील आठवड्यात ते सोनालीचा वाढदिवस असल्याने गावी आले होते. मंगळवारी सकाळीही राजू घराबाहेर पडले. घराच्या बाहेरच असलेल्या मराठा आंदोलनस्थळी त्यांनी भेट दिली. त्यानंतर ते घरी गेले. घरी पती-पत्नीसह दोन मुलींनी सोबत जेवणही केले; परंतु त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. यातूनच दाेघांनीही राहत्या घरातच आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाल्यानंतरही आई-पप्पा बाहेर येत नसल्याने मुलांनी दरवाजा वाजविला; परंतु आतून काहीच आवाज न आल्याने मुले ओरडली. त्यानंतर गावातील लोकांनी धाव घेतली. घरावरील पत्रे काढून आत प्रवेश केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह खाली उतरवून तलवाडा पोलिसांना संपर्क केला. जातेगाव आराेग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात याची नोंद झालेली नव्हती.
वादातून टोकाचे पाऊलपती-पत्नीने आत्महत्या केली आहे. प्रथमदर्शनी दोघांमध्येच झालेल्या वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. अधिक तपास सुरू आहे.- शंकर वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक, तलवाडा