बीड : जिल्ह्यात असलेल्या ६७६ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुले व मुलींच्या स्वच्छतागृहांची अद्यापही प्रतीक्षा आहे. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेजवळच आडोशाला, झाडे -झुडुपाआड नैसर्गिक विधी आटोपावा लागतो, तर जिल्हा परिषदेच्या २३६५ पैकी १९३० शाळांमध्ये मुलांचे तर २१२४ शाळांमध्ये मुलींचे स्वच्छतागृह असून समग्र शिक्षा अभियानांतर्गत दोन वर्षांपूर्वी मंजूर ९० पैकी केवळ एकाच स्वच्छतागृहाचे काम पूर्ण झाले आहे.
समग्र शिक्षा व इतर योजनांतून निधीचे स्रोत उपलब्ध असताना केवळ प्रशासकीय पातळीवरील लालफिताशाही, कामाचा उरक नसण्याची कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती, लोकप्रतिनिधींची उदासीनता या कारणांमुळे स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष झाले आहे. दोन वर्षांपूर्वी मंजूर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.
या तुलनेत खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये प्रसाधनगृहाची सोय मात्र चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे. खासगी अनुदानित ७४९ शाळांपैकी ७१२ शाळांमध्ये मुलांचे, तर ७३५ शाळांमध्ये मुलींसाठीचे स्वच्छतागृह उपलब्ध आहे. हे प्रमाण ९५ टक्के आहे. विनाअनुदानित ४३७ शाळांपैकी ४३० शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृह आहेत, तर ४२७ शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह असून हे प्रमाण ९८ टक्के आहे.
------
जिल्ह्यातील शासकीय, जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, विनाअनुदानित अशा एकूण ३६८६ शाळांपैकी ३०८० शाळांमध्ये मुलांचे तर ३२९२ शाळांमध्ये मुलींचे स्वच्छतागृह आहेत. जिल्ह्यातील एकूण ६०६ शाळांमध्ये मुलांचे तर ३९४ शाळांमध्ये मुलींचे स्वच्छतागृह नसल्याची स्थिती आहे. यात जि. प.च्या ४३५ शाळांमध्ये मुलांसाठी, तर २४१ शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याची माहिती आहे.
-------
ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत कर्मचारी उपलब्ध नसतात. शाळेजवळच्या परिसरातच आडोशाला विद्यार्थी नैसर्गिक विधी उरकतात. बहुतांश शाळांमध्ये स्वच्छतेचे काम खासगी व्यक्तीमार्फत करून घ्यावे लागते. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद नसल्याने शिक्षकच स्वखर्चाने स्वच्छतेची कामे करून घेतात.
-----
या आहेत अडचणी
काही शाळांमध्ये जागेची उपलब्धता नसते. काही ठिकाणी जागेचे दानपत्र देणारे ऐनवेळी हात आखडता घेतात. त्यामुळे स्वच्छतागृह उभारण्यास अडचणी येतात. काही ठिकाणी शाळा एकीकडे आणि दानपत्र दिलेली जागा दूर अंतरावर, अशीही परिस्थिती असते. तसेच इतर स्थानिक अडचणी असतात. बहुतांश ठिकाणी कोरोना परिस्थिती तसेच यंत्रणेतील उदासीनतेमुळे कामे झालेली नाहीत.
२०१९-२० मध्ये मुलींच्या स्वच्छतागृहाची ९० कामे मंजूर झाली होती. या ९० शाळांना ८५ लाखांचा निधी पहिला हप्ता म्हणून देण्यात आला. मात्र ज्या ठिकाणी कामे टप्प्यात आहेत त्याठिकाणी दुसऱ्या हप्त्याच्या निधीची मागणी प्रक्रिया सुरू आहे. मंजूर ९० पैकी फक्त केज तालुक्यात एक स्वच्छतागृह पूर्ण झाले आहे. ६५ ठिकाणी स्वच्छतागृहाची कामे प्रगतिपथावर सांगितली जात असली तरी वस्तुस्थिती तपासण्याची गरज आहे.
तालुकानिहाय मंजूर कामे (कंसात सुरू झालेली कामे)
अंबाजोगाई २ (-)
आष्टी २, (२)
बीड २६, (३)
धारूर ६, (४)
गेवराई १८, (४)
केज १४, (४)
माजलगाव ५, (१)
परळी १०, (२)
पाटोदा १ (-)
शिरूर ६ (४)
९० कामे मंजूर झाली होती पैकी २४ ठिकाणी कामे अद्याप सुरू झालेली नाही. ६५ कामे प्रगतिपथावर आहेत.
---
शाळांमधील वर्गखोल्या, स्वच्छतागृहांची मंजूर कामे उपलब्ध निधीनुसार सुरू आहेत. अपूर्ण कामे लवकरच पूर्ण केली जातील. पुढील उर्वरित व नव्या कामांसाठी प्रशासकीय मंजुरी प्रक्रिया व निधी उपलब्धता करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.
- शिवकन्या शिवाजी सिरसाट, अध्यक्ष जिल्हा परिषद, बीड
---------