बीड : सभागृहास मान्यता ही केज तालुक्यातील सारोळा येथे होती. परंतु ते बीड तालुक्यातील धावज्याच्यावाडीत बांधले. हा प्रकार परस्पर केल्याचे चौकशी समितीतून उघड झाले. त्यामुळे शासनाने अदा केलेला १८ लाख ४३ हजार रुपयांचा निधी परत करण्याचे आदेश जि.प.चे सदस्य व संस्थेचे कोषाध्यक्ष असलेले विजयकांत मुंडे यांच्या केजमधील देवगावच्या रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठानला दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी याबाबत तहसीलदारांनाही पत्र काढले आहे. पं. स. सभापती पिंटू ठोंबरे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली आहे.
केज तालुक्यातील सारोळा अंतर्गत अंबळाच बरड येथे रामदास आठवडे यांच्या खासदार फंडातून २४ लाख ९५ हजार रुपयांचे सामाजिक सभागृह मंजूर झाले हाेते. हे काम जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे व जि. प. सदस्य विजयकांत मुंडे यांच्या रेणुकामाता संस्थेला देण्यात आले. परंतु त्यांनी मंजूर ठिकाणाऐवजी बीड तालुक्यातील धावज्याच्यावाडीत बांधले. याबाबत सर्व माहिती गोपनीय ठेवत निधीही उचलला. याबाबत पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे यांनी तक्रार केल्यानंतर चौकशी झाली. यात ते दोषी असल्याचे सिद्ध झाले. यावर आता मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी संस्थेला १८ लाख ४३ हजार रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी वारंवार पत्र देऊनही धनादेश न दिल्याने आता दंडात्मक कारवाईचा इशाराही सीईओंनी दिला आहे. याबाबत तहसीलदारांनाही पत्र काढण्यात आले आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
--
संस्थेचे अध्यक्ष माजी जि. प. उपाध्यक्ष असून, कोषाध्यक्ष हे विद्यमान सदस्य आहेत. त्यांनी पदाचा गैरवापर करीत निधी हडपला आहे. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी तसेच वारंवार पत्र देऊनही रक्कम प्रशासनाला परत न केल्याने फौजदारी गुन्हा नोंद करावा.
पिंटू ठोंबरे, तक्रारदार तथा पं. स. सदस्य केज