माजलगाव : येथील बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तहसील कार्यालयाने फेब्रुवारी महिन्यापासूनचे निराधारांचे अनुदान पाठवून ही वाटपास बँकेकडून टाळाटाळ केली जात होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच मागील दोन दिवसांपासून निराधारांचे अनुदान वाटपास सुरुवात करण्यात आली.
वृद्ध, गोरगरीब, अपंग, संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ अशा विविध योजनेंतर्गत राज्य सरकारने वाटपासाठी दिलेले धनादेश व याद्या येथील बीड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा स्वीकारण्यास नकार देत आहेत. यामुळे मागील काही महिन्यापासून निराधारांची हेळसांड होत होती. फेब्रुवारी व मार्च महिन्यात भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, भारतीय पोस्ट खाते, जिल्हा मध्यवर्ती बँक याठिकाणी तहसील कार्यालयाने पात्र लोकांच्या याद्या व पैशांचा धनादेश दिले. ते इतर सर्व बॅंकांनी स्वीकारून वाटपही केले. मात्र येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तहसीलचा धनादेश व याद्या स्वीकारल्या नव्हत्या. कोविडमुळे काही झाल्यास जबाबदार कोण? असे बँकेच्या वतीने सांगून फेब्रुवारी व मार्च महिन्याचे धनादेश स्वीकारले नव्हते. १० एप्रिल रोजी तहसीलदार वैशाली पाटील या निराधार कक्षाचे नरेंद्र रूपदे यांच्यासमवेत मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गेल्या. तेथे व्यवस्थापक डी.के. शिंदे यांना ताकीद देऊन निराधारांना पैसे वाटप करण्याचे बजावले होते. यानंतर लॉकडाऊन सुरू झाले. तरी निराधारांच्या हातात दमडी देखील न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.
तहसील कार्यालयाने एप्रिल, मे महिन्याचे अनुदान देखील जिल्हा बँकेकडे वर्ग केलेले असताना देखील बँकेतून अनुदान वाटप होत नव्हते. याबाबत १ जून रोजी ‘लोकमत’ने ‘जिल्हा बँकेकडून निराधारांचे अनुदान वाटपास विलंब’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त प्रकाशित होताच मागील दोन दिवसापासून या बँकेकडून निराधारांचे अनुदान वाटपास सुरुवात करण्यात आली आहे.
...
===Photopath===
050621\img_20210603_123455_14.jpg
===Caption===
माजलगाव येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत निराधारांच्या अनुदानाचे वाटप सुरू होताच बँकेसमोर झालेली गर्दी.