शेतमजुरीमुळे रोहयो कामांकडे पाठ
बीड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असलेल्या कामांना मागणी घटली असल्याचे सध्या चित्र आहे. सध्या शेतात मोठ्या प्रमाणात मशागतीची कामे, काढणी, मोडणी, ऊसलागवड सुरू असल्याने शेतमजुरांना शेतावरच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. कारखान्याकडे स्थलांतर केलेले मजूर परतत आहेत. येत्या काही दिवसांत कामांची मागणी वाढणार असल्याचे चित्र आहे.
आठ तास वीज देण्याची मागणी
अंबाजोगाई : नवीन कृषीपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतु, अद्याप शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. रात्रीच्या वेळी वीज कमी- अधिक प्रमाणात पुरविली जात असल्याने शेतकऱ्यांना रात्री जीव धोक्यात घालून उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
स्वच्छतेअभावी सहयोगनगरात दुर्गंधी
बीड : शहरातील शासकीय गोदाम धान्य परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे दुर्गंधी सुटून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळोवेळी सांगूनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. कधी स्वच्छता केली जाते तर कधी याठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तसेच पडून असतात. साफसफाई, स्वच्छतेची मागणी होत आहे.