परळी : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यभरातील दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकार, केंद्र सरकार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अशा विविध माध्यमातून विविध साहाय्यक उपकरणे मिळवून देण्याची एक आगळी-वेगळी यशस्वी चळवळ सुरू झाली असून, या कामाचा अभिमान असल्याचे मत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, बीड जिल्हा आरोग्य विभाग, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व स्वरूप फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे शनिवारी ५८५ गरजू दिव्यांग व्यक्तींना २५ हजार रुपये किमतीचे डिजिटल श्रवण यंत्र मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात खा. सुप्रियाताई सुळे ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या.
जन्मजात कर्णबधिर असलेल्या किंवा काही कारणांनी श्रवणशक्ती गमावलेल्या व्यक्तींच्या कानात जेव्हा आपल्या प्रयत्नातून आवाज ऐकू येतो, त्याचे समाधान अन्य कोणत्याही मोठ्या कामापेक्षा श्रेष्ठ ठरते, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे संचालक विजय कान्हेकर, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, दत्ता आबा पाटील, जि. प. गटनेते अजय मुंडे, रा.काँ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, रा.काँ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, शिवाजी सिरसाट, पं. स. चे सभापती बालाजी मुंडे, या कार्यक्रमाचे कार्यवाहक डॉ. संतोष मुंडे, राजाभाऊ पौळ, माऊली गडदे, तुळशीराम पवार, प्रा. विनोद जगतकर, वैजनाथ बागवाले, अनंत इंगळे, अय्युब भाई, रमेश भोयटे, जयपाल लाहोटी, सय्यद सिराज आदी उपस्थित होते.
ताई ऐकू येतंय का? ... हो भाऊ
या कार्यक्रमात पूर्वनोंदणी व तपासणी केलेल्या ५८५ कर्णबधिर दिव्यांगांना श्रवण यंत्र तज्ज्ञ डॉक्टरांकडून बसवण्यात येत आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी मशीन बसवलेल्या एका ताईला, ‘ताई ऐकू येतंय का?’ असे विचारताच तिने मोठ्या आवाजात ‘हो भाऊ!’ असे उत्तर दिले. हा कार्यक्रम खा. सुळे लाईव्ह पाहत होत्या. ‘आमचे धनु भाऊ अत्यंत संवेदनशील नेतृत्व आहेत, त्या दिव्यांग व्यक्तीने हो, भाऊ आवाज येतोय म्हणून जेव्हा उत्तर दिले, तेव्हा धनु भाऊंच्या चेहऱ्यावरील आनंद केवळ केलेल्या कामाचे समाधान नाही तर खूप काही सांगून गेल्याचे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.
प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे संचालक डॉ. विजय कान्हेकर यांनी केले, तर कार्यक्रमाची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी उपस्थितांना दिली. गोविंद महाराज केंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.
140821\14_2_bed_17_14082021_14.jpeg
कानी आवाज पडताच आनंदले चेहरे