बीड : शहरातील वाहतूक कोंडीचा विषय बीडकरांच्या अंगवळणी पडला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी अनेकदा मागणी होते. मात्र, वाहतुकीचा प्रश्न जैसे थे राहतो. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून जाताना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांची गाडी अचानक थांबली. ते रस्त्यावर उतरले. साहेबांना पाहताच समोरच्या बाजूने वाहतूक पोलीस तेथे लगबगीने आला. तुम्ही तिकडे बसून काय राहता ? मी अनेकदा पाहतो. रोडवर उभे रहा, ट्रॅफिक कंट्रोल करा. लक्ष द्या, असे सांगत जिल्हाधिकाºयांनी या वाहतूक पोलिसाची कानउघडणी केली.
तीन दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांच्या वतीने जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांचा पीकविम्यात बीड जिल्हा देशात प्रथम आल्याबद्दल सत्कार केला. यावेळी मेटे यांनीही बीड शहरातील वाहतूक समस्येचा विषय बोलताना मांडला होता. शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी ‘साहेब, लक्ष द्या’ अशी विनंती मेटेंनी जिल्हाधिका-यांकडे केली होती. त्यावर सिंह यांनी प्रतिसाद देत वाहतुकीचा प्रश्न प्राधान्याने आपण यात लक्ष घालू, असा शब्द दिला होता.
योगायोगाने रविवारी वृक्ष लागवड मोहीम व इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जाताना अचानक त्यांची गाडी थांबली. ते गाडीतून उतरल्यानंतर आजूबाजूला पाहत असतानाच समोर आलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाºयाला सुनावले. खुद्द जिल्हाधिकाºयांना वाहतुकीच्या प्रश्नावर लक्ष घालावे लागले. किमान आता तरी नेहमी पावत्या फाडणाºया आणि दंड आकारणाºया तसेच खटले दाखल करणारे वाहतूक पोलीस वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी कामाला लागतील अशी अपेक्षा शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.वाहतूक पोलीस विभागाला सूचक इशाराशहरातील नगर रोड, शिवाजी चौक, बसस्थानक, साठे चौक, सुभाष रोड, भाजी मंडई, बशिरगंज भागात वाहतुकीची नेहमी कोंडी होते. बेशिस्त वाहनचालकही याला जबाबदार असतात. कोंडी झाल्यानंतर उशिराने पोलीस तेथे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करतात. एरव्ही खटले भरण्यावरच त्यांचे लक्ष असते. रविवारी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक पोलीस विभागाला सूचक इशारा दिला आहे.