रबी हंगामात ३ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात आलेला आहे. यापैकी ज्वारी पीक सर्वाधिक १ लाख ५९ हजार ७६९ हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. त्याखालोखाल १ लाख ३८ हजार क्षेत्रावर हरभरा पिकाचा पेरा आहे, तसेच गहू, मका या पिकांचा पेरा आहे. दरम्यान, यापैकी ज्वारी व गहू ही पिके शेतात उभी असल्यामुळे या अवकाळी पावसाचा फटका या पिकांना बसलेला नाही. थोड्या प्रमाणात अंबाजोगाई व धारूर तालुक्यातील काही ठिकणी मात्र, या पिकांनादेखील फटका बसला आहे, तर अनेक ठिकाणी हरभरा पिकाची काढणी झालेली असल्यामुळे त्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पाऊस, वारा व काही ठिकाणी गारा पडल्यामुळे आंबा व अंबे बहरातील फळबागांचे फळ धरणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील या अवकाळीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे.
अवकाळी पावसाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे, तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील पंचनामे करण्याचा आदेश प्रशासनाला दिले आहेत.
चौकट,
रोहतवाडीत दगावल्या शेळ्या
पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी येथील कदम नावाच्या शेतकऱ्यांच्या ५ शेळ्यांचा या अवकाळी पावसामुळे मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रशासनाकडून गावात जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शेळ्या मेल्याचे कारण स्पष्ट होईल त्यानुसार प्रशासनाकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
चौकट,
२ हजार हेक्टरवरील आंबा धोक्यात
आंबा पिकाला काही ठिकाणी मोहर लागलेला आहे, तर काही ठिकाणी फळधारणा सुरू झाली आहे. मात्र, मागील आठवड्यात वीज तोडल्यामुळे फळबागांना पाणी देता आले नाही. त्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ हजार हेक्टरवरील आंबा पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे या नुकसानीचे गांभीर्य समजून प्रशासनाने लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांनी दिली आहे.
प्रतिक्रिया
दोन दिवस झालेल्या पावसामुळे नुकसान झाले असेल त्याठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश मंडळ व तलाठी स्तरावर दिले आहेत. त्यानुसार अहवाल प्राप्त झाल्यावर नुकसानभरपाईसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल.
-रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी बीड
प्रतिक्रिया
बहुतांश ठिकाणी पिके उभे असल्यामुळे नुकसानीचे प्रमाण अत्यल्प आहे. काही ठिकाणी काढणीपश्चात हरभरा पिकाचे नुकसान झाले असेल, तर विमा कंपनीच्या टोल फ्री नंबर किंवा ई-मेलवर याची माहिती शेतकऱ्यांनी स्वत: द्यावी; अथवा कृषी सहायकाची मदत घ्यावी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
-डी.जी. मुळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड