लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी व पंचायत विभागाला दिले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच नुकसानाचा आकडा समोर येऊन कार्यवाही करता येईल. हा अहवाल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावरून मदतीसाठी मागणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
दि. ३० ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या दरम्यान जिल्ह्यातील जवळपास ६२ महसूल मंडलांत पाऊस झाला आहे. काही ठिकाणी जीवितहानीदेखील झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून, तहसीलदारांना विविध उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. कोणत्या महसूल मंडलात किती पाऊस झाला व अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाले, याचा अहवाल पंचनामा झाल्यानंतर प्राप्त होईल. प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे. ज्याठिकाणी मदतकार्य आवश्यक आहे, तिथे स्थानिक प्रशासन व एनडीआरएफचे जवान पोहोचत आहेत. शेतीपिकांचे नुकसान व जीवितहानी तसेच इतर नुकसानासंदर्भात तहसील स्तरावरून अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ मदत करणार असल्याचेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर, माहिती अधिकारी किरण वाघ उपस्थित होते.
विमा कंपनीकडे पाठपुरावा सुरू
पिकांचे नुकसान झाल्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशाने २५ टक्के अग्रिम रक्कम विमा कंपनीने शेतकऱ्यांना द्यावी, यासाठी अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, विमा कंपनीने काही त्रुटी काढल्यामुळे त्यासंदर्भात कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभाग विमा कंपनीकडे पाठपुरावा करत असून, त्यावरही लवकरच तोडगा निघेल, असेही शर्मा म्हणाले.
रिक्त पदांमुळे कामावर परिणाम
जिल्ह्यातील महसूल, कृषी, जिल्हा प्रशासन सर्वच विभागांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याचा कामावर परिणाम होत असून, काहीवेळा विलंबदेखील होत असल्याची खंतही शर्मा यांनी बोलून दाखवली.
--
सरसकट मदत देण्याची मागणी
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे अहवाल तयार होईपर्यंत सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल
व्यक्ती मयत ६
पशुधन मयत २९
कोंबड्या वाहून गेल्या १२००
घरांची पडझड २०
080921\08_2_bed_14_08092021_14.jpg
पत्रकारपरिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर माहिती अधिकारी किरन वाघ