लोकमत न्यूज नेटवर्कधारुर : तालुक्यातील कासारी, व्हरकटवाडी, मोटेवाडी या तीन गावच्या शिवारातील वनविभागाच्या मालकीच्या जंगलास आग लागून ३०० एकरच्या जवळपास क्षेत्रावरील झाडे जळून खाक झाले आहेत. तसेच जंगलालगतच्या शेतक-यांचे चार गोठे व सहा गंजी जळून खाक झाल्या. बारा तासानंतर या वणव्याची माहिती वन विभागाला मिळाली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याच्या संशयावरून वन विभागाने गुन्हा नोंद केला आहे. या आगीने बाजूच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
धारूर वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत कासारी, व्हरकटवाडी, मोटेवाडी या तीन गावच्या शिवारात मोठया प्रमाणात बालाघाटाचा डोंगर आहे. या डोंगरात वनविभागाचे २ हजार एकरच्या जवळपास जंगल आहे. या जंगलात वनविभागाने लागवड केलेले व नैसर्गिकरीत्या वाढलेली शिसू, कडूनिंब, सीताफळ, बाभूळ, पळस, धामुडा, साग इ. झाडांसह रानससे, हरीण, खोकड, मोर इ. प्राणी व पक्ष्यांचा वावर आहे. या जंगलास सोमवारी दुपारी अचानक आग लागली.
या आगीत ३०० एकरच्या जवळपास वनक्षेत्र जळून खाक झाले. सोमवारी दुपारी लागलेली आग मंगळवारी दुपारपर्यंत सुरु होती. काही शेतकरी व वनविभागाच्या कर्मचाºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.वन जमिनीच्या लगत असलेल्या कासारी येथील सिद्राम सोनवणे, सय्यद मुस्ताफा यांच्यासह चार शेतक-यांच्या गोठ्यास आग लागून शेती साहित्य खाक झाले. तसेच भोगलवाडी, कासारी येथील शेतक-यांच्या कडब्याच्या सहा गंजी जळून खाक झाल्या आहेत.
आगीमुळे जंगलातील झाडांचे मोठे नुकसान झाले असून अनेक वन्य प्राण्यांचा जीव गेल्याचे सांगण्यात आले. आगीमुळे जंगलातील मोठमोठी झाडे नंतर वाळून जातात. वन विभागाने जाळरेषा न काढल्यामुळे जंगल मोठ्या प्रमाणात जळाले आहे. जंगल किती जळाले, याची निश्चित आकडेवारी काढण्यासाठी मंगळवारी दुपारपासून जीपीएस यंत्राद्वारे कर्मचारी मोजणी करीत आहेत. या प्रकरणी वन विभागाने कोणीतरी आग लावल्याचा संशय धरून अज्ञात व्यक्ती विरोधात वन विभागाच्या कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दोन दिवस आगीची महिती कळू दिली नाहीसोमवारी दुपारी एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक लागलेली आग मंगळवारी दुपारपर्यंत सुरूच होती. एवढी मोठी घटना असतानाही दोन दिवस याची कोणाला माहितीच होऊ दिली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या आगीमुळे झाडांचे आणि शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे.