गेवराई/ धारूर :बीड जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसात झालेल्या सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज दुपारी अचानक विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पहाणी केली केली. यावेळी त्यांनी वस्तूनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे ही त्यांच्या समवेत उपस्थित होते.
बीड जिल्ह्यास परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. कापुस, सोयाबीन, तुर, ऊस यासह संपूर्ण खरीप पिकांचा चिखल झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बीड जिल्हा दोऱ्यावर आहेत. दुपारी १ वाजेच्या सुमारास केंद्रेकर यांनी काजळवाडी, सिरसदेवी या भागातील नुकसानीची थेट शेतात जाऊन पाहणी केली. त्यानंतर केंद्रेकर यांनी धारूर तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली.
या ठिकाणी केली पाहणी परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या गेवराई तालुक्यातील काजळवाडी, सिरसदेवी येथे थेट शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी आ.लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, तहसीलदार सचिन खाडे, मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळ, तलाठी माणिक पांढरे, उद्धव घोडके, प्रल्हाद येळापुरे, नानासाहेब पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. तर धारूर तालुक्यात केज रस्त्यावर विनायक शिनगारे यांच्या शेतातील सोयाबीन पिकात जाऊन पाहणी केली. या नुकसान भागात थेट बांधावर जाऊन माहिती घेत केंद्रेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तहसीलदार रामेश्वर स्वामी, तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे, मंडळ अधिकारी नजीर कुरेशी, तलाठी मुळे, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते
शासन शेतकऱ्यांच्या सोबतपरतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून निघणारे नाही. या काळात शासन तुमच्या पाठिशी आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून, पिकविम्याच्या तक्रारी असतील तर ऑनलाईन नोंदवा अथवा लेखी तक्रारी कराव्यात असे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केले. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.