लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत लक्ष्मीपूजन थाटात पार पडले. याप्रसंगी खातेवही आणि व्यवसायातील संगणकाची एकत्र पूजा अनेकांनी केली. तर पाडव्याच्या मुहुर्तावर सोने- चांदी तसेच वाहन बाजाराला मोठी आशा आहे. जवळपास ३०० दुचाकी आणि ९० चारचाकी वाहनांची खरेदी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर आठवडाभर सतत पावसामुळे ग्रामीण भागावर ओल्या दुष्काळाचे सावट जाणवले. बाजारात खरेदीसाठी चाकरमान्यांचीच गर्दी जास्त दिसून आली.सप्टेंबरपर्यंत पुरेसा पाऊस नसल्याने दुष्काळी सावट होते. नंतर निवडणुकांमुळे बाजारात ग्राहकी नव्हती. याच कालावधीत अवेळी पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हताश झाले. तरीही दिवाळी आनंद आणि उत्साहात साजरी झाली.शनिवारी रात्रीपासूनच ग्रामीण भागातील फूल विक्रेत्यांनी बाजारातील जागा निश्चित केल्या होत्या. पावसामुळे झेंडू ओला झाल्याने विकताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले. मोठी आवक व भिजलेला असल्याने सकाळी ४० रुपये विकलेला झेंडू दुपारनंतर ८ ते १० रुपये किलोने विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली. पावसामुळे गुलाब, कमळ, शेवंती, निशिगंध, मोगरा आदी फुलांची आवक फारशी नव्हती.सोन्याला चढली झळाळीसाडेतीन मुहूर्तापैकी एक विजयादशमीला बाजार सुस्त होता. मात्र दिवाळीनिमित्त धत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने- चांदीची खरेदी ग्राहकांनी केली तर पाडव्याच्या (बलिप्रतिपदा) मुहूर्तावर खरेदीसाठी अनेक ग्राहकांनी आगाऊ नोंदणी केली. सुवर्ण वेढणी, चांदीचे शिक्के, दागिने खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. रविवारी सोने ३९ हजार रुपये तोळा तर चांदी ५० हजार रुपये किलो होती.वाहन बाजाराला आशामागील दोन वर्षांपासून मंदीत असलेल्या वाहन बाजाराला पाडवा आणि नंतर मोठ्या आशा आहेत. वाहन खरेदीच्या विचारात असतानाच पावसामुळे परिस्थिती बदलली. तरीही पाडव्याला जवळपास ३०० दुचाकी आणि शंभरावर चार चाकी वाहनांची खरेदी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.दिवाळीनिमित्त आपल्या कुटुंबाचा आनंद साजरा करत असताना वंचितांनाही सहभागी करुन घेणारे सामाजिक उपक्रम मागील दोन तीन दिवसांपासून सुरु होते.
दिवाळी जोमात, सावट ओल्या दुष्काळाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:21 AM