बीड : टपरीच्या उद्घाटनासाठी विनापरवानगी डीजे वाजविला. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत डीजे जप्त केला. त्यानंतर त्याला ५२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मागील अनेक महिन्यांतील डीजेवरची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. बीड शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत होत आहे. इतर पोलिस ठाण्यांनी देखील अशीच कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बीड शहरातील सिद्धिविनायक मार्केट येथे एका टपरीच्या उद्घाटनासाठी हौशी लोकांनी डीजे वाजविला; परंतु त्यासाठी पोलिसांची कसलीही परवानगी घेतली नाही. सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. असे असतानाही या हौशी लोकांनी विनापरवाना डीजे वाजवला. बीड शहर पोलिसांनी या डीजेकडे धाव घेतली. आगोदर विराज नावाचा डीजे जप्त केला. त्यानंतर डीजेचा मालक लक्ष्मणराव मोहन गाडे (रा. सावंगी, ता. परतूर, जि. जालना) याला ५२ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंडात्मक कारवाई झाल्यानंतर डीजे सोडून देण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, बीड शहरचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. बाबा राठोड, गोवर्धन सोनवणे, जयसिंग वायकर, अश्फाक सय्यद व मनोज परजने यांनी केली.
अशाच कारवाया झाल्या तर वचक बसेलसध्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांत डीजे वाजविला जात आहे. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने या डीजेवर कसलीही कारवाई होत नाही. अनेकदा विनापरवानगी डीजे वाजविले जातात. आतापर्यंत या डीजेवर केवळ गुन्हे दाखल केले जात होते; परंतु आता पहिल्यांदाच डीजे जप्त करून त्याच्या मालकावर एवढ्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आता इतर पोलिस ठाण्यांत देखील अशाच कारवायांची अपेक्षा आहे. सध्या निवडणुका आणि इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी लावलेल्या डीजेमुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.