बीड : शहरातील शाहू नगर भागातील श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल शाळा प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कसलीही पूर्व सूचना न देता शाळा प्रशासनाने शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करत शाळा बंद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
शाळेच्या या निर्णयामुळे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) मोफत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्याच्या भवितव्याचे काय असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे या सर्व पालकांनी एकत्रित येत आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना लेखी निवेदन देत आपल्या समस्या मांडल्या.
आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या शाळेच्या प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल बार्शी रोड या शाखेत सामावून घेण्यात यावे किंवा या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची इतर शाळेत आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशाची सोय करण्यात यावी. आणि या शाळेवर आणि शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही या शाळेतील सर्व पालक लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन पुकारू असे पालकांच्या वतीने निवेदनात म्हटले आहे. यावेळी चंद्रशेखर सोनी, गोरख शिंदे, सुदामराव डोळस, सुरेखा ढेंबरे, रेखा करंजकर, शेख असद, रमेश कदम, गोंविद तिवारी,सुरेश पिव्हळ, राजेंद्र वाघ, अनिल पवार, विठ्ठल गायकवाड, सोमनाथ कापले, शीला जोगदंड ,भास्कर कदम, बाळू पवार,रामप्रसाद लखुटे , शंकर उगले, बळीराम, शाहू पौळ, अजय मिलानी, रामराव नागिशे, इलियास शेख आदी उपस्थित होते.