बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा १० मार्चपर्यंत बंद असल्यातरी शिक्षकांनी पूर्णवेळ शंभर टक्के उपस्थित राहून शैक्षणिक कामे करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. यासाठी १८ विविध कामे सुचविली आहेत.
जिल्ह्यातील पाचवी ते नववीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. परंतु काही शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी कोविड बाधित आढळले. एकूण ३६ जण बाधित आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाय तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दहावी आणि बारावीचे वर्ग वगळून सर्व माध्यम, व्यवस्थापनाच्या शाळेतील पाचवी ते नववीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात १० मार्चपर्यंत बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. त्यामुळे शाळा बंद असलेल्या कालावधीत शैक्षणिक कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रलंबित कामे पूर्ण करावीत
शोधमोहिमेंतर्गत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण पूर्ण करणे, आधार कार्ड नोंदणी व नूतणीकरण करणे, ऑनलाइन साधनांचा वापर करून अध्यापनाचे कामकाज सुरू ठेवणे, मुलांकडून ऑनलाइन स्वाध्याय पूर्ण करून घेणे, माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत दिलेली कामे विहित वेळेत पूर्ण करणे, जिओग्राफिकल गट तयार करून स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणे, शालेय ग्रंथालय, विद्यार्थी संचिका अद्ययावत करणे, शाळेत परसबाग निर्माण करणे, आरटीई २५ प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे, शालेय पोषण आहार अभिलेखे अद्यावत करणे, पोषण आहार वितरण करणे, सरलप्रणालीवर प्रलंबित ऑनलाइन कामे पूर्ण करणे, प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती ऑनलाइन कामे पूर्ण करणे, अभ्यासक्रमाबाबत कृती आराखडा तयार करणे, अध्ययन, अध्यापन निष्पत्तीवर प्रश्नपेढी तयार करणे, मुख्याध्यापकांनी हंगामी वसतिगृहांबाबत नियंत्रण ठेवणे, राष्ट्रीय जंताशक मोहिमेत सहभाग नोंदवणे, सर्व शिक्षकांनी स्वत:चे कोविड लसीकरण करून घेणे, अंतरिक्ष शाळा व ॲस्ट्रॉनाॅमीबाबतची आवश्यक कार्यवाही पूर्ण करणे आदी कामांची यादी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्व शाळांना पाठविण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.
-----
सर्वच शाळांना आदेश
शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांप्रमाणे गुरुजींना काम राहिले नव्हते. बहुतांश ठिकाणी शाळा सुरू असताना दांडी मारणाऱ्या गुरुजींची तर शाळा बंद कालावधीत मौजच झाली आहे. बंदच्या निर्णयानंतर शाळा वाऱ्यावर सोडून गुरुजी फिरकलेही नाहीत. त्यामुळे प्रशासनाला हे आदेश काढावे लागले असून, जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या तसेच सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
---
===Photopath===
020321\022_bed_3_02032021_14.jpg
===Caption===
जिल्हा परिषद